वॉशिंग्टन : अंतरीक्षाच्या असीम मंचावर अनेक प्रकारचे नाट्य व नृत्य सुरू असते. आता संशोधकांनी अशा दोन आकाशगंगांचा शोध लावला आहे ज्या कोट्यवधी वर्षांपासून एकमेकींकडे खेचल्या जात आहेत. जणू काही भेटीसाठी आतुर झालेल्या या दोन आकाशगंगा नृत्यच करीत एकमेकींकडे येत असल्यासारखे दिसते.
या आकाशगंगांमधील तारे दोन्ही आकाशगंगांमधील आकर्षणामुळे कधी जवळ येतात तर कधी दूर जातात. त्यामुळे कुणीतरी गॅलेक्टिक बॅले फॉर्मेशनमध्ये डान्सच करीत असल्यासारखे दृश्य निर्माण होते. अमेरिकेच्या निधीतून बनवलेल्या डार्क एनर्जी कॅमेर्याने या आकाशगंगांना टिपून घेतले आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर या दोन आकाशगंगा असून त्या 400 दशलक्ष वर्षांपासून एकमेकींमध्ये मिसळून जाण्यासाठी येत आहेत. यापैकी एका आकाशगंगेचे नाव 'एनजीसी 1512' असून दुसरीचे नाव 'एनजीसी 1510' आहे. या दोन्हींमध्ये 'एनजीसी 1512' ही आकाशगंगा मोठी आहे. ती आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने छोट्या 'एनजीसी 1510' आकाशगंगेला आपल्यामध्ये सामावून घेत आहे. त्यामुळे तार्यांच्या निर्मितीच्या लहरी निर्माण झाल्या आहेत.