विश्वसंचार

दुसर्‍याच्या घरट्यात अंडी घालणार्‍या पक्ष्यांची पिल्लेही असतात चतुर!

Arun Patil

लंडन : कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते असे आपण ऐकत असतो. दुसर्‍याच्या घरट्यात अंडी घालून पिल्लांना जन्म देणारे असे अनेक पक्षी असतात. त्यांना 'पॅरासाईट बर्डस्' असे म्हटले जाते. एखाद्या बांडगुळासारखेच त्यांचे वागणे असल्याने त्यांना असे 'परजीवी' किंवा 'पॅरासाईट' म्हटले जाते.

दुसर्‍याच्या घरट्यात अंडी घालणार्‍या या पक्ष्यांच्या पिल्लांनाही दुसर्‍याचा फायदा घेऊन आपले अस्तित्व टिकवण्याचे बाळकडू अंड्यात असतानाच मिळालेले असते. काही पिल्ली तर अंड्यात असतानाच 'व्यायाम' करून स्वतःची शक्ती वाढवतात आणि अंड्यातून बाहेर पडताच घरट्यातील अन्य पिल्लांना मारून टाकतात!

अंड्यातून बाहेर पडलेली अशी पिल्ले सकृतदर्शनी नाजूक व निष्पाप वाटत असली तरी ती मोठी चतुर आणि आक्रमक असतात असे आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे. ही पिल्ले 'ब्रूड पॅरासाईटस्' या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रजातींच्या समूहांमधील आहेत. या पिल्लांच्या माता त्यांची अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालतात. इतर पक्ष्यांनी ती ऊबवून पिल्लांना जन्म द्यावा तसेच त्याचे पालनपोषण करावे असा त्यांचा हेतू असतो. यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च करण्याची त्यांची तयारी नसते.

इतकेच नव्हे तर त्यासाठी चाणाक्षपणे कसे वागावे व स्वतःचा फायदा कसा करून घ्यावा, हे अशा कुटुंबाच्या 'डीएनए'मध्येच असते. ब्राऊन-हेडेड काऊबर्ड नावाचे पक्षीही आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालतात. ग्रेटर हनीगाईड पक्ष्यांच्या माद्या तर इतर पक्ष्यांच्या घरट्यातील त्यांची स्वतःची अंडी फोडून टाकतात जेणेकरून आपल्या अंड्यातील पिल्लांना स्पर्धक राहू नये! आता याबाबत एक नवे संशोधन झाले आहे.

त्यानुसार कॉमन कुकू किंवा कोकिळेची पिल्ले जन्मल्यानंतर केवळ एक किंवा दोन दिवसांचे असतानाच घरट्यातील अन्य अंडी पाठीने ढकलून घरट्याबाहेर फेकतात. एखाद्या नवजात बाळाने बॉलिंगचा चेंडू ढकलला तर आपल्याला आश्चर्य वाटू शकेल. मात्र, ही कोकिळेची पिल्ली अंड्यातच व्यायाम करून स्वतःमध्ये अशी क्षमता निर्माण करतात. ग्रेटर हनीगाईडची पिल्ले (छायाचित्र पाहा) अंड्यातून बाहेर येताच घरट्यातील इतर पिल्लांना मारून टाकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT