विश्वसंचार

तीस लाख वर्षांपूर्वी होते चिमुकले पेंग्विन

Shambhuraj Pachindre

वेलिंग्टन : एके काळी पृथ्वीवर अतिशय छोट्या आकाराचे पेंग्विनही वावरत होते असे आता दिसून आले आहे. संशोधकांना अशाच दोन पेंग्विनचे अवशेष न्यूझीलंडमध्ये सापडले आहेत. हे अवशेष तीस लाख वर्षांपूर्वीचे आहेत.

नॉर्थ आयलंडवरील दक्षिण टारानाकी भागात या नव्या प्रजातीच्या पेंग्विनचे दोन जीवाश्मभूत कवट्या सापडल्या. त्यांना 'विल्सन्स लिटल पेंग्विन' असे म्हटले जात आहे. या लुप्त प्रजातीला आता 'युडीप्टुला विल्सनी' असे नाव देण्यात आले आहे. या दोन कवट्यांपैकी एक पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ पेंग्विनची असून दुसरी लहान वयाच्या पेंग्विनची आहे. दोन्ही कवट्यांच्या आकारात 'युडीप्टुला मानर' या छोट्या आकाराच्या पेंग्विन प्रजातीशी बरेच साम्य आहे. ही प्रजाती अद्यापही अस्तित्वात आहे. ती जगातील सर्वात छोट्या आकाराची पेंग्विन प्रजाती आहे. लुप्त प्रजातीमधील ज्या पेंग्विनच्या कवट्या आता सापडल्या आहेत त्यांची हाडे सापडलेली नसल्याने त्यांचा नेमका आकार समजण्यात अडचण आहे.

मात्र, कवटीच्या आकारावरून त्यांच्या शरीराचा अंदाज बांधण्यात आला आहे. सध्याचे छोटे पेंग्विन पूर्ण वाढ झाल्यावर अवघ्या 13.5 इंच उंचीचे होतात व त्यांचे वजन दोन पौंड म्हणजे 0.9 किलो असते. तशाच आकाराचे हे लुप्त झालेले पेंग्विनही होते. सध्या असे छोटे पेंग्विन आणि त्यांच्या चार उपप्रजाती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियामध्ये आढळतात. त्यांची उत्पत्ती नेमकी कुठे झाली हे अद्यापही स्पष्ट नाही. मात्र, या नव्या संशोधनावरून त्यांचे मूळ न्यूझीलंडमध्येच असावे हे स्पष्ट होत आहे.

SCROLL FOR NEXT