इस्तंबुल : 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' असे आपण जे म्हणतो ते एका वेगळ्या अर्थाने 'सर्वात उंच व्यक्ती' म्हणून विक्रम नोंदवणार्या माणसांबाबतही घडत असते. या लोकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. जगातील सर्वात उंच तरुणी असलेली तुर्कीची 24 वर्षीय रुमेयसा गेलगी याला अपवाद नाही. तिची उंची तब्बल 7 फूट 0.7 इंच इतकी म्हणजेच 215.16 सेंटीमीटर आहे. अर्थातच तिची ही उंची नैसर्गिकरीत्या वाढली नसून एका आजारामुळे वाढलेली आहे. तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली असली तरी तिलाही या उंचीमुळे व आजाराने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही ती आहे त्या स्थितीचा स्वीकार करून आनंदात जीवन जगत आहे.
गिनिज बुकनुसार रुमेयसा ही जगातील सर्वात उंच (हयात) तरुणी आहे. तिला 'विव्हर सिंड्रोम' नावाचा आजार आहे. हा एक दुर्मीळ विकार असून त्यामध्ये उंची बेसुमार वेगाने वाढते. या उंचीमुळे ती सामान्य जीवन जगू शकत नाही. तिला व्हीलचेअर किंवा वॉकिंग फ—ेमचा आधार घ्यावा लागतो. 'अशा प्रकारचा जनुकीय आजार असणारी मी तुर्कीमधील एकमेव मुलगी आहे', असे ती स्वतःच सांगते. विशेष म्हणजे 2014 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी रुमेयसाच्या नावावर सर्वात उंच किशोरवयीन मुलगी असा विक्रम नोंदवण्यात आला होता. 2021 मध्ये दुसर्यांदा तिचे नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आले.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेन्डे यांनी सांगितले की रुमेयसाचे रेकॉर्ड बुकमध्ये पुन्हा स्वागत करणे ही आमच्यासाठीही सन्मानाची बाब आहे. तिचे आयुष्य सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. रुमेयसाने सांगितले, प्रत्येक नकारात्मक गोष्ट सकारात्मकतेत कशी बदलता येईल याचा विचार सर्वांनी केला तर हे जग खुपच सुंदर होईल. मी उंच आहे हे माझे नुकसान नाही तर फायदेशीर आहे असाच मी विचार करते. प्रथम तुम्ही तुमचा स्वीकार करा, स्वतःला कमी लेखू नका, तुमच्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि शक्य तितके प्रयत्न करीत राहा!