लंडन : कोसोनोच्या प्रिस्टिना येथे राहणार्या एका तरुणाने अख्खा मोबाईल फोन गिळला. 'नोकिया 3310' हा नोकिया कंपनीकडून 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला बनवलेल्या मॉडेलचा मोबाईल फोन या व्यक्तीने गिळला. पोटात दुखत असल्याने या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर शस्त्रक्रिया करून हा फोन बाहेर काढण्यात आला.
या व्यक्तीची तपासणी आणि स्कॅनिंग केल्यावर त्याच्या पोटात हा फोन असल्याचे दिसून आले. फोन तसेच त्याच्या बॅटरीतील रसायने त्याच्यासाठी अत्यंत घातक असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. तेलजाकब यांनी ही शस्त्रक्रिया केली.
त्यांनीच फेसबुकवर या फोनचे फोटो तसेच एक्स-रे आणि एन्डोस्कोपीच्या कॉपी शेअर केल्या. हा फोन तीन भागांत विभागला गेला होता. त्यामध्येच एक बॅटरीही होती. या बॅटरीचा पोटातच स्फोट होण्याचाही धोका होता. पोटात दुखू लागल्यानंतर हा माणूस स्वतःच प्रिस्टिना येथील रुग्णालयात आला होता. त्याने फोन का गिळला हे मात्र अद्याप समजलेले नाही.