नवी दिल्ली : जगभरात आकाराने सामान्य फळांपेक्षा मोठी फळे लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत असतात. अशा काही फळांची व फळभाज्यांची रेकॉर्ड बुकमध्ये नोंदही होत असते. आता मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील केळी लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही केळी तब्बल तेरा इंच लांबीची आहेत. सर्वसाधारणपणे केळी आठ ते नऊ इंच लांबीची असतात. मात्र, तेरा इंच लांबीची ही केळी पाहून लोक चकीत होत आहेत.
बरवनी जिल्ह्यातील बागुड गावातील शेतकरी अरविंद जाट यांच्या शेतात ही केळी लागली आहेत. एका केळाचे वजन 250 ग्रॅम आहे. अरविंद जाट हे गेल्या 37 वर्षांपासून केळीची शेती करतात. त्यामुळे लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकाला काय लागते याचा त्यांना अचूक अभ्यास झाला आहे. लागवडीपासून ते तोडणीपर्यंत सर्व काही त्यांनाच करावे लागते. त्यानुसार पिकात खताचा वापर करण्यात आला. दिवसेंदिवस उत्पादनात वाढ होत गेली; पण केळीची लांबीही वाढलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वीच ही केळी इराण व इराकला दहा ते बारा टन पाठवण्यात आली. भारतातीलही एका बड्या कंपनीकडून या केळीची खरेदी होत आहे.