हैदराबाद : येथील सैफाबादमध्ये प्राचीन नाण्यांचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये 11935.8 ग्रॅम म्हणजेच तब्बल 12 किलो वजनाचे सोन्याचे नाणेही प्रदर्शनासाठी ठेवले होते. बादशाह जहाँगीरचे हे नाणे हैदराबादच्या मुकर्रम जाह यांना वारसा हक्काने मिळालेले आहे.
हे बारा किलो वजनाचे सोन्याचे नाणे सर्वांच्याच कुतुहलाचा विषय बनले होते. सीबीआयचे माजी सहसंचालक शंतनू सेन यांनी लिहिलेल्या 'सीबीआय टेल्स फ्रॉम द बिग आय' पुस्तकात या रहस्यमय नाण्याविषयीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. 10 एप्रिल 1612 मध्ये जहाँगीरच्या दरबारात आलेला इराणच्या शाहचा दूत यादगार अली याला हे नाणे भेट म्हणून दिल्याची नोंद 'तुझुक-ई-जहाँगिरी' या जहाँगीरच्या आत्मचरित्रात आहे. त्यानंतर हे नाणे हैदराबादच्या निजामांकडे कसे आले याचे गूढ कायम आहे. भारतात सुमारे तीन हजार वर्षांपासून नाणी प्रचलित आहेत. अशी अतिप्राचीन नाणी या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. देशभरातून अनेक संग्राहक या प्रदर्शनात सहभागी झाले होते.