जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीत अतिशय खोलवर नुकतेच भूगर्भजल सापडले. हे भूमिगत पाणी तब्बल 1.2 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. हे पाणी या पृथ्वीतलावरील सर्वात जुन्या पाण्यापैकी एक असावे असा संशोधकांचा कयास आहे. आजुबाजूच्या खडकांशी झालेल्या त्याच्या रासायनिक क्रियेच्या अभ्यासानंतर पृथ्वीच्या क्रस्टमधील ऊर्जानिर्मिती व साठवणूक याबाबत नवी माहिती मिळू शकेल.
'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. कॅनडाच्या टोरांटो युनिव्हर्सिटीतील ऑलिव्हर वॉर यांनी या शोधामोहिमेत नेतृत्व केले. त्यांनी म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेतील या भूगर्भजलात रेडिओ अॅक्टिव्हिटीमुळे निर्माण होणार्या पदार्थांचे मोठे प्रमाण आहे. जोहान्सबर्गपासून नैऋत्येस 161 किलोमीटरवर मोआब खोत्सोंग ही सोने व युरेनियमची खाण आहे.
ही जगातील काही सर्वात खोल खाणींपैकी एक आहे. ही खाण जमिनीच्या पृष्ठभागापासून तब्बल 3 किलोमीटर खोल आहे. याच खाणीत हे अत्यंत जुने असे भूगर्भजल सापडले आहे. त्यामध्ये समुद्राच्या पाण्यापेक्षाही आठ पटीने अधिक मीठ आहे. तसेच युरेनियम, रेडिओजेनिक हेलियम, निऑन, अर्गोन, झेनॉन आणि क्रिप्टॉनचे अंशही सापडले आहेत.