टोकियो : संशोधकांनी तब्बल 32,500 वर्षांपूर्वीच्या अस्वलाच्या कवटीतून डीएनए मिळवले आहे. त्यावरून असे दिसून आले की हिमयुगातील हे तपकिरी अस्वल जपानचे सर्वात मोठे बेट 'होन्शू'मधून स्थलांतर करून मृत्युपूर्वी सध्याच्या टोकियोजवळ येऊन राहिले होते.
सध्या जपानमधील तपकिरी अस्वलं ही केवळ उत्तरेकडील होक्कैदो या बेटावरच आढळतात. होक्कैदोच्या उत्तरेकडील सखलीन नावाच्या बेटावरून त्यांचे पूर्वज तिथे आले होते याचेही पुरावे मिळालेले आहेत.
सध्या हे सखलीन नावाचे बेट रशियाच्या ताब्यात आहे. 2.6 दशलक्ष ते सुमारे 11,700 वर्षांपूर्वी ही दोन्ही बेटं जमिनीच्या तुकड्यांनी जोडलेली होती. त्यावरूनच या अस्वलांचे स्थलांतर झालेले असावे.
सध्या जरी टोकियोच्या आसपास तपकिरी अस्वलं आढळत नसली तरी होन्शू बेटावर अनेक ठिकाणी 3 लाख 40 हजार ते वीस हजार वर्षांपूर्वीच्या अस्वलांचे जीवाश्म सापडलेले आहेत. 'रॉयल सोसायटी ओपन सायन्स' या नियतकालिकात त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
टोकियोच्या वायव्येकडील एका गुहेत अस्वलांची जवळजवळ संपूर्णपणे सुस्थितीत असलेली कवटी सापडली होती. त्याची मजबूत रचना प्राचीन डीएनएचा र्हास होण्यापासून रोखणारी होती. त्यामधून काढलेल्या डीएनए चाच आता अभ्यास करण्यात आला आहे.