वॉशिंग्टन : कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर अक्षरशः राज्य करणार्या डायनासोरचा सुस्थितीमधील सांगाडा सापडणे हे एखादा खजिना सापडण्यासारखेच आहे. वैज्ञानिक संशोधनासाठी असे जीवाश्म अनमोल असेच असते. मात्र, काही सांगाड्यांचा खरोखरच लिलावही केला जातो. आता सुमारे 7.7 कोटी वर्षांपूर्वीच्या टायरानोसॉरस रेक्स (टी-रेक्स) प्रजातीच्या एका डायनासोरच्या सांगाड्याला लिलावात 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 47 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमत मिळाली आहे.
'सोथबी'कडून हा लिलाव करण्यात आला. हा प्रागैतिहासिक काळातील सांगाडा सन 2018 मध्ये अमेरिकेतील मोंटाना राज्यात सापडला होता. गुरुवारी नॅचरल हिस्टरी ऑक्शनमध्ये त्याला 6.07 दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळाली. 'सोथबी'ने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की हा सांगाडा टी-रेक्समधील गोर्गोसॉरसचा आहे. असे केवळ 20 गोर्गोसॉरस नमुने सापडलेले आहेत व त्यामध्येही हा सांगाडा खासगी मालकीचा एकमेव सांगाडा आहे. असे बहुतांश नमुने कॅनडातच सापडलेले आहेत.
तिथे डायनासोरच्या सांगांड्यांची खासगी विक्री करण्यावर अत्यंत कडक नियम आहेत. ऑक्शन हाऊसने या विशालकाय सांगाड्याला खरेदी करणार्या व्यक्तीची ओळख उघड केली नाही. हा सुमारे 10 फूट उंच आणि 22 फूट लांबीचा सांगाडा आहे. कंपनीने म्हटले आहे की 'गोर्गोसॉरस' म्हणजे 'भयानक सरडा'. 7.7 कोटी वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेच्या पश्चिम क्षेत्रात असे डायनासोर वावरत होते.