न्यूयॉर्क : 'ज्युरासिक पार्क'सारखे चित्रपट पाहिल्याने 'डायनासोर' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर केवळ 'टी-रेक्स' प्रजातीचे डायनासोरच येतात. हे डायनासोर हिंसक व मांसाहारी होते. 'टायरॅनोसॉरस रेक्स' नावाचे हे डायनासोर पृथ्वीवर वावरलेल्या सर्व डायनासोरमध्ये सर्वात आक्रमक व क्रूर होते यात शंकाच नाही. मात्र, ते नेमके किती मोठ्या आकाराचे होते याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की सध्याच्या सर्वात मोठ्या टी-रेक्स डायनासोरच्या जीवाश्मावरून त्यांच्या आकाराचे जे अनुमान काढले जाते, त्यापेक्षाही ते 70 टक्के अधिक मोठे असावेत! त्यांचे वजन 33 हजार पौंडांचे म्हणजेच 15 हजार किलो असावे.
ओटावामधील कॅनेडियन म्युझियम ऑफ नेचरमधील पॅलियोंटोलॉजिस्टनी याबाबतचे संशोधन केले आहे. एखाद्या स्कूलबसपेक्षाही अधिक वजनाचे हे टी-रेक्स असावेत असे त्यांना वाटते. एखाद्या स्कूल बसचे वजन 11 हजार किलो असते. टोरांटोमधील 'सोसायटी ऑफ व्हर्टेब—ेट पॅलियोंटोलॉजी'च्या वार्षिक परिषदेवेळी याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली.
सध्या जे सर्वात मोठ्या टी-रेक्सचे जीवाश्म उपलब्ध आहे त्याला 'स्कॉटी' असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन तो जिवंत असताना सुमारे 8,870 किलो असावे असा अंदाज आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार सर्वात मोठा टी-रेक्स 'स्कॉटी'पेक्षाही 70 टक्के अधिक मोठा असावा, असे कॅनेडियन म्युझियम ऑफ नेचरमधील संशोधक जॉर्डन मॅलन यांनी म्हटले आहे. यामुळे टी-रेक्सचा आकार सध्याच्या धारणेपेक्षा दुपटीने वाढलेला आहे असेही त्यांनी सांगितले.