लंडन : यावर्षी जानेवारीत 57 वर्षांच्या डेव्हिड बेनेट सिनिअर यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून त्यांच्यावर जनुकीय सुधारणा केलेल्या डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. या हृदयासह ते दोन महिने जिवंत राहिले आणि नुकतेच त्यांचे निधन झाले. मात्र, यानिमित्ताने आता जगभर 'झेनोट्रान्सप्लांटेशन'ची चर्चा सुरू झाली आहे. प्राण्यांच्या अवयवांचे मानवी देहात गरजेनुसार प्रत्यारोपण करून मानवाचे आयुर्मान वाढवता येऊ शकते का याची चाचपणी आता सुरू झाली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी बेनेट यांच्यावर या जनुकीय सुधारित हृदयाचे प्रत्यारोपण केले होते. बेनेट यांची या प्रत्यारोपणानंतर प्रकृती ठिक होती व ते आपल्या कुटुंबासमवेत वेळही घालवत होते. मात्र, दोन महिन्यांनंतर म्हणजेच 8 मार्चला त्यांचे निधन झाले. मात्र, यामुळे झेनोट्रान्सप्लांटबाबत जगभरात कुतुहल वाढले.
अमेरिकेच्या फेडरल ड्रग्ज असोसिएशनने म्हटले आहे की झेनोट्रान्सप्लांटेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मानवेतर प्राणी स्रोतापासून पेशी, अवयव किंवा ऊतींचे प्रत्यारोपण किंवा फलन यांचा समावेश होतो. या प्रक्रियेमध्ये प्राण्याशी संबंधित आणि जनुकीय सुधारित अवयवही समाविष्ट आहेत. प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव सहज उपलब्ध होत नसतात. त्यामुळे हा पर्यायी मार्ग विचारात घेतला जात आहे. अर्थात ही एक धोकादायक प्रक्रिया आहे. मानवी शरीर कोणतेही बाह्य अवयव नाकारत असते. त्यामुळे शरीराने स्वीकारावे अशा पद्धतीचे बदल अशा अवयवांमध्ये केले जात असतात. त्याला किती यश मिळेल हे सांगता येत नाही.