जयपूर : राजस्थानमध्ये जैसलमेरच्या वाळवंटात एक दुर्मीळ शोध लागला आहे. तिथे 'हायबोडोंट' या नावाने ओळखल्या जाणार्या व सध्या लुप्त झालेल्या प्रागैतिहासिक काळातील शार्क माशाचे दात सापडले आहेत. एका प्राचीन खडकात हे शार्क माशाचे दात असून ते 16 कोटी ते 16 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीचे आहेत.
ट्राइऐसिक काळ व प्रारंभिक ज्युरासिक काळात (252 ते 174 दशलक्ष वर्षांपूर्वी) नदी व समुद्र अशा दोन्ही ठिकाणी हायबोडोंट मासे होते. मध्य ज्युरासिक काळात (174 ते 163 दशलक्ष वर्षांपूर्वी) समुद्रात राहणार्या या माशांच्या संख्येत झपाट्याने घट होऊ लागली. अखेर 6 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी क्रेटेशियस काळात ही प्रजाती नष्ट झाली असे मानले जाते.
आता जे जीवाश्म आढळले आहे ते स्ट्रोफोडस वंशाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. भारतीय उपखंडात प्रथमच या वंशाशी संबंधित एखाद्या प्रजातीचे जीवाश्म सापडले आहे. आशियातील हे तिसरे उदाहरण असून यापूर्वी जपान आणि थायलंडमध्ये असे जीवाश्म सापडले होते.
दाताचे हे जीवाश्म भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय)च्या जयपूरमधील पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यांनी शोधले. आयआयटी रुडकी येथील डॉ. सुनील वाजपेयी यांनी याबाबतचे महत्त्वाचे संशोधन केले.