न्यूयॉर्क ः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' च्या वैज्ञानिकांनी प्रथमच अंतराळात पाच आकाशगंगांचा एक समूह पाहिला आहे. त्याला 'स्टीफन्स क्विन्टेट' असे नाव आहे. या समूहाची हाय रिझोल्यूशनची छायाचित्रेही टिपण्यात यश आले आहे. या छायाचित्रांवरून 'नासा'च्या वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या काळातील स्थिती समजून घेण्यास मदत मिळू शकते. सुरुवातीच्या काळात ब्रह्मांड कसे दिसत होते हे यावरून समजू शकते.
जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीच्या हायरिझोल्यूशन असलेल्या इन्फ्रारेड कॅमेर्याच्या सहाय्याने ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. या छायाचित्रात वैज्ञानिकांनी हजारो क्लस्टर्स (तारकापुंज) आणि लाखो नवे तारेही पाहिले आहेत. या क्षेत्रातील स्टारबर्स्टमधून नव्या तार्यांच्या जन्माचेही पुरावे मिळालेले आहेत. तार्यांच्या जन्मावेळी असलेले वायू, धूळ यामधून स्वच्छ दिसून येते. यापैकी एका आकाशगंगेचे नाव 'एनजीसी 7318 बी' असे आहे. ही आकाशगंगा एका विशाल क्लस्टरच्या मध्ये आहे. या पाच आकाशगंगांच्या समूहाला 'हिकसन कॉम्पॅक्ट ग्रुप 92' (एचसीजी 92) असेही म्हटले जाते. यापैकी चार आकाशगंगा एकमेकींच्या अतिशय जवळ असून पाचवी 'एनजीसी 320' काही अंतरावर आहे. 'एनजीसी 7320' ही आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
अन्य आकाशगंगा सुमारे 3 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. या छायाचित्रे ब्रम्हांडाच्या उत्पत्तीचे रहस्य जाणून घेण्याबरोबरच कृष्णविवरांबाबतही जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 'एनजीसी 7319' ही यामधील आकाशगंगा एखाद्या शक्तिशाली कृष्णविवरासारखीच आहे जी सूर्यापेक्षा सुमारे 24 कोटी पट मोठी आहे. त्यामधील ऊर्जा सूर्यासारख्या सुमारे 4 अब्ज तार्यांना प्रकाशित करू शकते.