लंडन : पृथ्वीच्या इतिहासात जीवसृष्टीचा संहार करणार्या पाच घटना घडलेल्या आहेत. 25 कोटी वर्षांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती, त्यामध्ये पृथ्वीवरील 90 टक्के जीवसृष्टीचा र्हास झाला होता. या प्रलयाला 'एंड पर्मियन' किंवा 'ग्रेट डाईंग' असे म्हटले जाते. विशेष म्हणजे या मोठ्या संहारानंतरही पृथ्वीवर जीवसृष्टीचे नवे सृजन झाले होते. त्यामधून जे प्राणी निर्माण झाले ते आपल्या पूर्वजांपेक्षाही अधिक 'स्मार्ट' होते.
इंग्लंडच्या बि—स्टल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली जीवाश्म वैज्ञानिकांच्या एका टीमने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना आढळले की, 'ग्रेट डाईंग'च्या प्रलयानंतर नव्या शिकार्यांचा जन्म झाला. त्यामध्ये सरडे व पक्ष्यांच्या प्रजातीचे जीव अधिक विकसित झाले. सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये केस किंवा पंखांचा विकास झाला. 20-25 कोटी वर्षांपूर्वी जमिनीवरील आणि पाण्यातील प्राण्यांमध्ये अतिशय ऊर्जा होती. त्यांच्या शरीराची रचना त्यांना अधिक वेगवान बनवत होती. संशोधक मायकल बेंटन यांनी सांगितले की, सर्व काही अतिशय वेगाने होत होते. सध्याचे पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये बराच फरक आहे.
तसेच सरीसृप जीवांच्या प्रजातीही वेगळ्या आहेत. सरीसृप हे शीत रक्ताचे असतात, याचा अर्थ त्यांचे शरीर अधिक उष्णता निर्माण करीत नाही. मात्र, तरीही ते अतिशय चपळ असतात. त्यांच्यामध्ये सहनशक्ती नसते व ते थंडीत राहू शकत नाहीत. त्यांच्यात जमिनीबरोबरच समुद्रातही विकास दिसून आला. डॉ. फेक्सियांग वू यांनी सांगितले की, मासे, खेकडे, गॅस्ट्रोपॉड आणि स्टारफिशने शिकार करण्याच्या नव्या पद्धतींचा विकास केला. ते अधिक वेगवान व शक्तिशाली बनले. संहाराच्या आधीचे त्यांचे पूर्वज तुलनेने कमजोर होते. या संशोधनासाठी चीनमध्ये सापडलेल्या जीवाश्माचा वापर करण्यात आला आहे.