पॅरिस : समुद्रतळाशी बुडालेल्या जहाजाचे अवशेष मिळणे ही काही नवलाईची बाब नाही. मात्र, फ्रान्समध्ये जमिनीखाली 1300 वर्षांपूर्वीच्या एका जहाजाचे अवशेष सापडलेले आहेत. हे अवशेष इतके नाजूक आहेत की केवळ हवेच्या संपर्कात आल्यानेच त्यांचा र्हास होऊ लागला आहे. बोर्डोजवळ एका उत्खननावेळी या 40 फूट लांबीच्या जहाजाचे अवशेष सापडले होते. आता ते वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शेकडो वर्षे गाळात दफन राहिल्यामुळे त्याचे लाकूड प्रकाश आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आले नव्हते. त्यामुळे आता ते हवेच्या संपर्कात आल्याने लाकडातील पाण्याचा अंश वेगाने कमी होऊ लागला आहे. मात्र, ते वाचविण्यासाठी आता संशोधकांची टीम दर अर्ध्या तासाने त्यावर पाण्याचा स्प्रे फवारते. हे जहाज बाहेर काढून कुठे ठेवायचे याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. या जहाजाच्या अवशेषांच्या सहाय्याने त्याची पुनर्निमितीही होऊ शकते असे पुरातत्त्व संशोधकांना वाटते.
2013 मध्ये सापडलेल्या या जहाजाची निर्मिती इसवी सन 680 ते इसवी सन 720 पर्यंत झालेली असावी. या जहाजाचा वापर गारोन नदीतून मालवाहतूक करण्यासाठी होत असे. हे जहाज इतके मजबूत होते की ते अटलांटिकपर्यंत प्रवास करू शकत होते. त्याच्या अवशेषांचे आता फोटो सर्वेक्षण होईल व थ-ी-डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते पुन्हा बनवण्यात येईल. त्याचे भाग वेगळे करून बाहेर काढले जातील व नंतर पुन्हा जोडले जातील.