विश्वसंचार

जमिनीखाली एव्हरेस्टपेक्षा शंभर पट लांब शिळा!

Arun Patil

लंडन : पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती उलगडण्यासाठी संशोधक सतत प्रयत्नशील असतात. आता संशोधकांनी पृथ्वीच्या पोटातील एका रहस्यमय ब्लॉबची प्रतिमा बनवून ही रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 'ब्लॉब' म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि तिचा गाभा (कोअर) यांच्यामधील उष्ण खडकांचा एक जाड स्तर. तो घनरूपात असला तरी हळूहळू वाहत असतो. या ब्लॉबचा संबंध टेक्टोनिक प्लेटस्च्या गतीशी असतो असे मानले जाते. जमिनीखाली माऊंट एव्हरेस्टपेक्षा शंभर पट अधिक लांबीचा ब्लॉब असल्याचे आढळले आहे.

वैज्ञानिकांनी या ब्लॉबला 'जटील आणि आकर्षक' म्हटले आहे. या ब्लॉबची प्रतिमा 'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे संशोधन एका गोल भूमिगत 'पॉकेट'वर केंद्रीत आहे ज्याला 'अल्ट्रा-लो वेलोसिटी झोन' असे म्हटले जाते. जे हवाई बेटांच्या खाली अस्तित्वात आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की या प्रतिमा भूकंप विज्ञानात 'मैलाचा दगड' ठरू शकतात.

केम्बि—ज युनिव्हर्सिटीचे भूभौतिक शास्त्रज्ञ जी ली यांनी सांगितले की पृथ्वीच्या सर्व आंतरिक विशेषतांमध्ये ही सर्वात आकर्षक आणि तितकीच गुंतागुंतीची रचना आहे. पृथ्वीची आंतरिक संरचना पाहण्यासाठीचा हा पहिला ठोस पुरावा मिळाला आहे जो भूकंप विज्ञानासाठी 'मैलाचा दगड' ठरू शकतो. या प्रतिमांना सरस बनवण्यासाठी वैज्ञानिक दीर्घकाळापासून प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी अनेक उपकरणांचा वापर केला; पण प्रतिमा चांगल्या मिळाल्या नाहीत.

पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या अंतराने त्याला आव्हानात्मक बनवले होते. यावेळी वैज्ञानिकांनी कॉम्प्यूटर मॉडलिंगच्या मदतीने प्रतिमा बनवल्या. त्यासाठी पृथ्वीच्या स्तरांच्या माध्यमातून पाठवलेल्या सिग्नलपासून डेटा घेण्यात आला. हा ब्लॉब 'थिया' या ग्रहाचा अवशेष असावा असेही संशोधकांना वाटते. हा प्रोटोप्लॅनेट 4.5 अब्ज वर्षांपृर्वी पृथ्वीला धडकला व त्यामुळेच चंद्राची निर्मिती झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT