बीजिंग : वादळेही अनेक प्रकारची असतात. सागरी किंवा जमिनीवरील वादळे ही जीवित वा वित्तहानी करू शकतात. आता चीनमध्ये वाळूचे वादळ उठले आहे. चीनच्या वायव्येकडील कांजी (किंघाई) येथे हे पिवळे वादळ येऊन गेले. वाळवंटातील या वादळाचे काही व्हिडीओही आता समोर आले आहेत. या वादळाचा आवाज शिटी वाजवल्यासारखा आणि भयावह आहे.
या वादळामुळे वाळवंटाजवळच्या शहरात धुळीची चादर आच्छादली गेली. वादळाने सुमारे 200 मीटर उंचीइतकी वाळूची भिंत निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की सूर्यही वादळाने झाकोळून गेला. शहरातील वाहतूकही बराच काळ ठप्प होती. हे धुळीचे वादळ सुमारे चार तास घोंघावत होते. त्याचा सर्वाधिक फटका हायक्सी मंगोल आणि तिबेटला बसला.
स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना चार भिंतीच्या आडोशातच राहावे लागले. वादळाने आकाशाचा रंगही पिवळा-नारंगी झाला. 2020 च्या ऑक्टोबरमध्येही असेच पिवळे वादळ निर्माण झाले होते. आता आलेल्या वादळाने द़ृश्यमानता 200 मीटरपेक्षाही कमी होती.