अंकारा : जगात आजपर्यंत झालेल्या क्रूर शासकांची ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी सर्वप्रथम चंगेज खानचे नाव समोर येते. चंगेज खान हा एकटाच कूर होता असे नाही तर त्याचा नातू हलागू खानही तितकाच क्रूर शासक होता. अत्यंत क्रूर अशी ख्याती असलेल्या हलागू खानचा तुर्कीतील भव्य महाल संशोधकांनी नुकताच शोधून काढल्याचा दावा केला जात आहे.
पुरातत्त्ववाद्यांच्या मते, त्यांनी तुर्कीत एक भव्य महालाचा शोध लावला आहे. संभवता हा महाल हलागू खानचा असू शकतो. हा क्रूर शासक 1217 ते 1265 दरम्यान जिवंत होता. त्याने दक्षिण-पश्चिम आशियातील बहुतेक भागांवर कब्जा केला होता. सध्या जो महाल शोधून काढण्यात आला आहे, तेथे सर्वप्रथम लूट करण्यात आली आणि नंतर महालाची नासधूस करण्यात आली.
हलागू खानने 1258 मध्ये बगदादवरही हल्ला केला होता. त्यावेळी हे शहर इस्लामची सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानी होते. मात्र, हलागू खानच्या हल्ल्यात बगदादच्या बहुतेक भागाचे प्रचंड नुकसान झाले होते. हलागू खान हा चंगेज खानच्या चौथ्या मुलाचा पुत्र होता. असेही म्हटले जाते की, चंगेज खानने आपल्या युद्धमोहिमांदरम्यान सुमारे चार कोटी लोकांना ठार मारले होते. हा आकडा तत्कालीन लोकसंख्येच्या 10 टक्के आहे.
पुरातत्त्ववाद्यांनी हलागू खानच्या महालात संशोधकांना छताचे टाईल्स, चिनी मातीची व मातीची भांडीही सापडली आहेत. तसेच एका ठिकाणी तर मानवी हाडे आणि खोपड्याही सापडल्या आहेत. याशिवाय स्वस्तिकाची चिन्हे सापडली आहेत.