लुधियाना : 'हौसेला मोल नाही' असे म्हणतात ते खरेच आहे. पंजाबच्या लुधियानाच्या घोडेबाजारात हेच पाहायला मिळाले. घोडे खरेदी करण्यासाठी लोक हवी ती किंमत देण्यास तयार असल्याचे तिथे दिसून आले. तिथे धूरकोट येथून आलेले जतिंदर सिंह आणि त्यांचा मुलगा जगदीप सिंह यांच्या घोड्यांचे मोठेच आकर्षण होते. 'सिंकदर' आणि 'नवाब' नावाच्या या घोड्यांना अनुक्रमे 74 लाख आणि 45 लाख रुपयांची किंमतही मिळाली. मात्र, तरीही हे दोन्ही घोडे त्यांनी विकले नाहीत.
हे केवळ घोडेच नाहीत, तर आमचे 'सपनों के सौदागर' आहेत, असे या बाप-लेकाने सांगितले. हे दोन्ही उमदे घोडे अनेक उत्तम लक्षणांचे आहेत. जगदीप सिंह यांनी सांगितले की, त्यांचे संपूर्ण कुटुंबच घोड्यांचे शौकीन आहे. त्यासाठी धूरकोट येथे एक स्टड फार्मच बनवण्यात आला आहे. त्यांच्याकडे सुमारे पंधरा घोडे आहेत.
'सिंकदर'ला त्यांनी दीड महिन्यापूर्वीच गुजरातमधून 65 लाख रुपयांना खरेदी केले होते. या घोड्याचा बाप रोहतगडच्या राजघराण्याचा घोडा होता. नवाब घोड्याचीही वेगळीच शान आहे. त्याचा बाप असलेला 'नाग' नावाचा घोडाही प्रसिद्ध असून, त्याची किंमत अडीच कोटी रुपये आहे.
'नवाब'ने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पुष्कर, मुक्तसर, पतियाळा आणि हनुमानगढ येथील स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. काळ्या, चमकदार रंगाचा 'नवाब' घोडा सर्वांनाच आकर्षित करतो. या दोन्ही घोड्यांना शुद्ध घरगुती तूप आवडते. ते नियमितपणे बाजरी आणि मक्याचेही सेवन करतात. त्यांच्या देखभालीसाठी तीन माणसं ठेवलेली आहेत.