विश्वसंचार

ग्रीक दंतवैद्य सोन्याच्या तारेने जोडत होते तुटलेला जबडा

Arun Patil

अथेन्स : ग्रीसच्या पुरातत्त्व संशोधकांनी म्हटले आहे की चौदाव्या शतकातील ग्रीक दंतवैद्य अतिशय कुशलतेने आपले काम करीत असत. या काळातील एका बायझेंटाईन योद्ध्याने आपला तुटलेला जबडा सोन्याच्या तारेने जोडून घेतला होता. या योद्ध्याच्या कवटीचा शोध 1991 मध्ये घेण्यात आला होता.

ओट्टोमन सैन्याद्वारे ठार झाल्यानंतर या योद्ध्याला प्राचीन थ्रेसमध्ये एका किल्ल्यातील कबरस्तानात पाच वर्षांच्या बालिकेच्या थडग्यातच दफन करण्यात आले होते. अलीकडेच संशोधकांनी त्याच्या कवटीचा नव्याने अभ्यास केला.

त्यांना आढळले की मृत्युपूर्वी एक दशक आधी त्याचा जबडा दोन ठिकाणी तुटला होता. एखाद्या व्यावसायिक तज्ज्ञाने त्याच्यावर सावधगिरीने उपचार केले होते. या तज्ज्ञाने दोन हजार वर्षांपूर्वी एका ग्रीस तज्ज्ञाने सांगितलेल्या पद्धतीचे पालन करून उपचार केले होते.

या अज्ञात योद्ध्याची कवटी आणि खालचा जबडा यांचा सुमारे तीस वर्षांपूर्वी पॉलिस्टाईलन किल्ल्यामध्ये शोध घेण्यात आला होता. 'मेडिटेरेनियन आर्कियोलॉजी अँड आर्कियोमेट्री' नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

या माणसाला मुलीच्या सांगाड्याजवळच अतिशय काळजीपूर्वक दफन करण्यात आले होते. या मुलीशी त्याचे कोणते नाते होते हे समजलेले नाही. मात्र, अनेक शतकांपूर्वीच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य पाहून संशोधक चकीत झाले आहेत.

SCROLL FOR NEXT