न्यूयॉर्क ः गोल्डफिश होऊ शकतात फुटबॉलइतके मोठे होऊ शकते. तुम्ही फुटबॉलइतक्या आकाराचे गोल्डफिश कधी पाहिले आहेत का? घरगुती अॅक्वॅरियम किंवा फिश टँकमध्ये सोडलेले गोल्डफिश आकाराने जास्तीत जास्त दोन इंच लांब असतात.
मात्र, एखाद्या सरोवरात हेच मासे सोडले तर ते दीड फूट लांबीचेही होऊ शकतात तसेच त्यांचे वजन दोन किलो होऊ शकते. घरात पाळलेले गोल्डफिश जास्त जगत नाहीत. मात्र, नैसर्गिक अधिवासात सोडलेले असे मासे चांगलेच मजबूत असतात आणि ते 25 वर्षेही जगू शकतात.
अमेरिकेतील लोक आपण पाळलेले असे मासे अनेक वेळा तळ्यात नेऊन सोडतात व तिथे हे मासे मोठे होतात. त्यामुळे बर्याच समस्या निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सध्या मिनेसोटा लेकमध्ये अशा फुटबॉलच्या आकाराच्या गोल्डफिशनी डोकेदुखी निर्माण करून ठेवली आहे. हे मासे लोकांनीच विविध कारणांमुळे घरातील अॅक्वॅरियममधून आणून सोडले होते.
बर्न्सविले शहरातील लेक केलरमध्येही लोकांनी सोडलेले असे मासे मोठ्या आकाराचे बनले असून त्यांच्यामुळे तळ्याच्या नैसर्गिक स्थितीस बाधा येत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लोकांना असे मासे तळ्यात सोडू नये अशी जाहीर सूचना केली आहे.
हे मासे तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक मोठे होतात आणि त्यामुळे तळ्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होते, असे तेथील अधिकार्यांनी म्हटले आहे. 2013 मध्ये दीड फूट म्हणजेच 46 सेंटीमीटर लांब आणि 4 पौंड म्हणजेच दोन किलो वजनाचा गोल्डफिश लेक ताहोमध्ये सापडला होता.