विश्वसंचार

गोठलेल्या नदीत मासे पकडण्याचा उत्सव!

Arun Patil

सेऊल : माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे असेच म्हणावे लागेल. जगभरात लोकांनी अनेक उत्सव निर्माण केलेले आहेत. टोमॅटो फेकून मारण्याच्या उत्सवापासून ते चिखलात लोळण्याच्या उत्सवापर्यंतचे अनेक प्रकारचे उत्सव जगाच्या पाठीवर पाहायला मिळतात. दक्षिण कोरियातही असाच एक अनोखा उत्सव आहे. तो आहे चक्क मासे पकडण्याचा. अर्थात हे मासे पकडायचे असतात गोठलेल्या नदीत. बर्फाचा थर फोडून त्यामध्ये छिद्र निर्माण केले जाते व खाली पाण्यात असलेले मासे या उत्सवात पकडले जातात!

सोबतचे छायाचित्र दक्षिण कोरियातील गोठलेल्या ह्यचियोन नदीचे आहे. तेथे शनिवारी मासे पकडण्याचा हा उत्सव सुरू झाला. त्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले. 23 दिवस चालणारा हा उत्सव 29 जानेवारी रोजी संपणार आहे. मासे पकडण्यासाठी लोक बर्फाला भेगा किंवा छिद्र पाडतात. यानंतर ते काट्याने मासे पकडण्याची स्पर्धा करतात.

जानेवारीत उत्तर कोरिया सीमेलगतच्या या भागातील तापमान उणे 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. अशा थंडीत नदीच्या पृष्ठभागावर सहा इंच जाड बर्फाचा थर जमा होतो. उत्सवात देश-विदेशातील पर्यटक सहभागी होतात. गात्रे गोठवणार्‍या थंडीतही लोक असे उत्सव निर्माण करून जीवनाचा आनंद घेत असतात.

SCROLL FOR NEXT