वॉशिंग्टन : एखाद्या महिलेच्या पोटात गर्भ वाढतोय आणि त्याची तिला कल्पनाच नाही, असं काही वेळेला लक्षणांच्या अभावामुळे होत असते. अमेरिकेतही अशीच एक अशी घटना घडली आहे जिथे महिलेला ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर अवघ्या 48 तासांतच तिने बाळाला जन्म दिला आहे.
अमेरिकेतील नेब्रास्का येथील 23 वर्षीय पेटन स्टोवरला गरोदरपणाची कोणतीच लक्षणे शरीरात आढळून आली नव्हती. थकवा जाणवत होता; पण तोसुद्धा कामाच्या ताणामुळं असावा असं तिला वाटत होतं. पाय सुजू लागल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली आणि तिथे धक्कादायक माहिती समोर आली. प्रियकर ट्रॅविस कोएस्टरसोबतच्या नात्यातून ती गरोदर असल्याचे त्याचवेळी कळले. प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले; पण खात्री करून घेण्यासाठी म्हणून तिची सोनोग्राफीही करण्यात आली. जेव्हा कुठे पोटात गर्भ वाढत असल्याच्या माहितीवर तिचा विश्वास बसला.
पेटन गरोदर असल्याचे कळताच काही महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी धावपळ सुरू केली. कारण पेटनची किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर सिझेरियनच्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली. पेटनने अवघ्या 1 किलो 800 ग्रॅम वजनाच्या मुलाला जन्म दिला. 10 आठवडे आधीच जन्म झाल्यामुळे त्याचं वजन इतकं कमी होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार पेटन प्री-एक्लेमप्सिया पीडित होती. ज्यामध्ये गरोदरपणादरम्यान रक्तदाब वाढू शकतो.