वॉशिंग्टनः संशोधकांना कोलोरॅडोमध्ये तब्बल 6 कोटी 50 लाख वर्षांपूर्वीच्या एका प्राण्याचे जीवाश्म आढळले आहे. त्यामध्ये या छोट्याशा, सस्तन प्राण्याच्या कवटीचा समावेश आहे. आता लुप्त झालेली ही प्रजाती सध्याच्या गाय-बैल, हरीण यासारख्या खूर असणार्या प्राण्यांची पूर्वज होती. लघुग्रहाच्या धडकेनंतर डायनासोर नष्ट झाल्यावर या प्राण्यांचा उदय झाला होता. सध्याच्या चिंचिला प्राण्याइतका त्यांचा आकार होता व वजन 455 ग्रॅम होते. या नव्या प्रजातीला 'मिलीटोकोडोन लायडी' असे नाव देण्यात आले आहे.
66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशिअस-पॅलिओजीन काळातील महासंहारानंतर सस्तन प्राणी वेगवेगळ्या रुपाने कसे विकसित झाले हे जाणून घेण्यासाठी एम. लायडी या प्राण्याच्या शोधाची मदत होईल. डेनवर म्युझियम ऑफ नेचर अँड सायन्समधील व्हर्टीब्रेट पॅलिओंटोलॉजीचे क्युरेटर टायलर लायसन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, या मध्यंतरीच्या काळातील दगडांमध्ये अतिशय तुरळक जीवाश्म आढळतात.
त्यामुळे आता या प्राण्याच्या कवटीचे जीवाश्म मिळणे ही मोठी बाब आहे. त्यावरून पृथ्वीवरील गेल्या महासंहारानंतरच्या काळात सस्तन प्राण्यांमधील विविधता जाणून घेणे शक्य होणार आहे. लायसन आणि त्यांच्या सहकार्यांनी याबाबतच्या संशोधनाची माहिती 'जर्नल ऑफ मॅमेलियन इव्हॉल्युशन' या नियतकालिकात दिली आहे. एम. लायडी हे प्राणी 65.43 दशलक्ष वर्षांपूर्वी वावरत होते. कोलोरॅडोमध्ये या प्राण्याची कवटी व जबड्याचा भाग आढळून आला. त्यावरून ते कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र तयार करण्यात आले.