टोकियो ः जगभरात खाण्यापिण्याच्या बाबतही काही अजब प्रथा आहेत व त्या तिथे पाळाव्याही लागत असतात. तसे केले नाही तर वाईट समजले जाते. अशाच काही प्रथांची ही माहिती…जपानमध्ये जर तुम्ही चॉपस्टिकच्या सहाय्याने अन्न खात असाल तर हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, इथे जेवताना चॉपस्टिकला उभ्या स्थितीत ठेवणे अशुभ मानले जाते. चॉपस्टिक आडवेच ठेवावे लागतात.
एखाद्याच्या मृत्यूनंतर चॉपस्टिक उभे ठेवले जातात. अंत्यसंस्कारावेळी शरीरातील हाडे अशा प्रकारे उचलली जात असतात. त्यामुळे हॉटेलमध्ये असे केले तर कर्मचार्यांना वाईट वाटते. चीनमध्ये जेवणाची थाळी चाटूनपुसून साफ करणे अयोग्य समजले जाते. जर तुम्ही थोडे अन्न ताटात सोडले तर ते शेफची स्तुती केल्यासारखेच होते. ताट स्वच्छ केले तर तुम्हाला कमी जेवण दिले आहे आणि तुम्हाला आणखी भूक होती, असा समज होतो.
थायलंडमध्ये काटा चमचा वापरणे अयोग्य मानले जाते. तिथे तुम्ही काट्याने चमच्यात अन्न घेऊ शकता, पण त्यापेक्षा अधिक वापर करणे वाईट मानले जाते. इजिप्त किंवा पोर्तुगालमध्ये जेवताना पुन्हा मीठ किंवा मीरपूड मागणे चुकीचे मानले जाते. याचे कारण म्हणजे असे केल्यास जेवण चविष्ट झालेले नाही, असा समज होतो व तो स्वयंपाक करणार्याचा अपमान समजला जातो. इटलीत अनेक खाद्यपदार्थांमध्ये चीजचा वापर केला जातो. मात्र, ते पुन्हा मागून घेणे हा शेफचा अपमान केल्यासारखे मानले जाते. तुम्हाला जेवण आवडले नाही व त्याची चव बदलण्याची तुमची इच्छा आहे, असा तिकडे समज होतो!