विश्वसंचार

केवळ 20 सेकंदांत हृदयविकाराचे निदान

Arun Patil

लंडन : अमेरिकेत दरवर्षी बारा लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्‍नेटिक रेजोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन करतात. 'एमआरआय' करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचाही वेळ लागतो. मात्र, ब्रिटिश वैज्ञानिकांनी आता हा कालावधी अनेक पटींनी कमी केला आहे.

ब्रिटन हार्ट फाऊंडेशनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करून हे नवे 'एमआरआय' मशिन डिझाईन केले आहे. त्याच्या मदतीने केवळ वीस सेकंदांमध्येच कोणत्याही प्रकारचा हृदयविकार किंवा हार्ट ब्लॉकेजचा छडा लावता येऊ शकतो. विशेष म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सामान्य चेकअपच्या तुलनेत तेरा मिनिटांचा वेळ वाचतो. याचा अर्थ 40 पट वेगाने हृदयाचे संपूर्ण स्कॅनिंग होऊ शकते. सध्या या तंत्राचा वापर लंडन युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये केला जात आहे. तिथे दर आठवड्याला सुमारे 140 हृदयरुग्णांची तपासणी होत आहे.

या प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. रॉड्री डेव्हीस यांनी सांगितले की हृदयाच्या गुंतागुंतीच्या संरचनांचा सहजपणे छडा लावून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या तंत्रामुळे डॉक्टरांच्या अपॉईंटमेंटमध्ये जाणारा वेळही वाचू शकतो. 'एआय'ला नऊ वेगवेगळ्या स्थितींमध्ये 'एमआरआय' स्कॅनचा उपयोग करून विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये हार्टअ‍ॅटॅक, हाय ब्लडप्रेशर, हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपॅथी, हृदयाचे स्नायू कमजोर होणे आदींचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT