नवी दिल्ली ः बर्याच वेळा आपण इतरांशी संवाद साधत असताना डोळ्यांना डोळे भिडवूनच बोलत असतो. अशा वेळी आपल्याला जाणवते की अनेकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे असतात. काही लोकांचे डोळे तपकिरी व काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. काहींचे डोळे हिरवट, राखाडी आणि निळेही असतात. डोळ्यांचे रंग असे वेगवेगळे का असतात, याबाबत आपल्याला कुतूहल वाटू शकते.
वास्तविक डोळ्यांच्या रंगाचा संबंध संबंधित व्यक्तीच्या डीएनएशी असतो. तो बुबुळाच्या मेलॅनिनच्या प्रमाणावरून ठरतो. यासोबतच प्रथिनांची घनता आणि सभोवतालच्या प्रकाशाचाही बुबुळांच्या रंगावर परिणाम होतो.
डोळ्याचा रंग नऊ श्रेणींमध्ये विभागलेला आहे आणि डोळ्याच्या रंगाशी संबंधित 16 जनुके आहेत. जे दोन प्रमुख जीन्स म्हणजेच जनुके डोळ्याच्या रंगाला जबाबदार असतात ते 'ओसीए2' आणि 'एचईआरसी2' हे आहेत. दोघांचेही क्रोमोझोम्स (गुणसूत्रे) 15 मध्ये असतात. 'एचईआरपीसी2' जनुक हे 'ओसीए2' च्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवते आणि 'एचईआरसी2' काही प्रमाणात निळ्या डोळ्यांसाठी जबाबदार आहे. त्याच वेळी 'ओसीए2' काही प्रमाणात निळ्या आणि हिरव्या डोळ्यांशी संबंधित आहे. बहुतेक लोकांचे डोळे तपकिरी असतात. याचे कारण त्याचे समीकरण विकसित करणारी जीन्स आणि क्रोमोझोम्स बहुतेक लोकांमध्ये असतात. असे मानले जाते की निळे डोळे असलेल्या लोकांची संख्या जगात सर्वात कमी आहे. असेही म्हटले जाते की निळ्या डोळ्यांच्या लोकांचे पूर्वज एकच आहेत. यामध्ये असेही मानले जाते की सुमारे 6 हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी मानवी जीन्सममध्ये बदल झाला होता. त्यामुळे काही लोकांच्या डोळ्यांच्या रंग निळा होऊ लागला.