विश्वसंचार

कारमध्ये विंडशिल्ड तिरकी का असते?

Arun Patil

नवी दिल्ली : बसची विंडशिल्ड सरळ उभी असते; पण मोटारींची विंडशिल्ड तिरकी असते. असे का असते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? कार बनवणार्‍या कंपन्या आपल्या मोटारींमध्ये सरळ उभी विंडशिल्ड का देत नाहीत? याचे कारण आहे 'एअरोडायनॅमिक्स'!

मोटारींना अधिक एअरोडायनॅमिक बनवण्यासाठी त्यांची विंडशिल्ड तिरकी बनवण्यात येत असते. बसच्या तुलनेत कारमध्ये अधिक एअरोडायनॅमिक असते. सोप्या भाषेत सांगायचे तर कारमध्ये विंडशिल्ड अशी तिरकी लावल्याने वारे किंवा हवा सहजपणे बाजूला होते व कार सुरळीतपणे पुढे धावते. जर विंडशिल्ड सरळ उभी असती तर मोटार पुढे जात असताना हवेचा दाब अधिक प्रमाणात पडला असता व मोटार मागे ढकलली गेली असती. अशा विंडशिल्डमुळे कारसमोरी हवा सहजपणे बाजूला हटू शकत नाही. त्यासाठी मग अधिक ऊर्जेची आवश्यकता पडली असती व इंजिनवरही जोर पडला असता.

'एअरोडायनॅमिक्स'चा विचार केवळ कारच्या विंडशिल्डबाबतच केला जातो असे नाही तर कारचे संपूर्ण डिझाईन बनवत असतानाही केला जात असतो. ज्या वेगवान कार असतात त्यांचे इंजिन तर शक्तिशाली असतेच, शिवाय त्यांचे एअरोडायनॅमिक्सही अधिक चांगले असते. सर्वसाधारणपणे विंडशिल्ड दोन प्रकारचे असतात, लॅमिनेटेड आणि टेम्पर्ड. टेम्पर्ड विंडशिल्डच्या तुलनेत लॅमिनेटेड विंडशिल्ड सरस मानले जाते. याचे कारण म्हणजे हे विंडशिल्ड बनवण्यासाठी त्यामध्ये दोन काचांचा वापर केला जातो व त्यांच्यामध्ये प्लास्टिक असते. त्यामुळे दुर्घटनेवेळी अशी काच सहजपणे तुटत नाही.

SCROLL FOR NEXT