विश्वसंचार

कानही देतात हार्ट अ‍ॅटॅकचे संकेत!

backup backup

न्यूयॉर्क ः जगभरात होणार्‍या मृत्यूंमागील सर्वात मोठ्या कारणांमध्ये हार्टअ‍ॅटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याचा समावेश होतो. दरवर्षी सुमारे 2 कोटी लोक हार्टअ‍ॅटॅकची शिकार बनतात. हार्टअ‍ॅटॅकचे संकेत आपले शरीर देत असते व त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अगदी आपले कानही हार्ट अ‍ॅटॅकचे संकेत देतात. अमेरिकेतील 'सीडीसी'ने दिलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना होतात. या वेदना काही मिनिटे राहतात किंवा कमी होऊन पुन्हा सुरू होतात. या बेचैनीवेळी छातीवर दाब दिल्यासारखीही भावना होते. थकवा येणे किंवा चक्‍कर आल्यासारखे होणे ही सुद्धा काही लक्षणे आहेत. यावेळी सातत्याने घामही येऊ लागतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार पुरुष आणि महिलांमध्ये हार्टअ‍ॅटॅकची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. मात्र, छातीत वेदना किंवा बेचैनी हे एक सर्वसामान्य लक्षण आहे. महिलांमध्ये काही अन्यही लक्षणे दिसतात. त्यामध्ये श्‍वास लागणे, मळमळणे, उलटी, पाठ किंवा जबड्यात वेदना यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व लक्षणांशिवाय कानही एक वेगळा संकेत देत असतो. त्याला 'फ्रँक्स साईन' किंवा 'फ्रँक्स क्रीज' असे म्हटले जाते. 'इअरलोब क्रीज' म्हणजेच कानाच्या पाळ्या आकुंचित होणे, त्यांना खोल सुरकुत्या पडणे यामधून हा संकेत दिसतो. या स्थितीला सँडर्स टी. फ्रँक यांच्यावरून हे नाव देण्यात आले आहे. त्यांनीच सर्वप्रथम छातीतील वेदना आणि कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज असलेल्या रुग्णांच्या कानात क्रीज पाहिली होती. अर्थात हे सिद्ध करण्यासाठी मजबूत पुरावा उपलब्ध नाही. फ्रँक्स साईनमागे अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. हे मेंदूच्या गतिरोधाचे किंवा अकाली वृद्धत्व, त्वचेच्या व चेतातंतूंच्या नुकसानीचेही पूर्वसूचक असू शकतात.

SCROLL FOR NEXT