न्यूयॉर्क : तन-मनाच्या विश्रांतीसाठी व आरोग्यासाठी पुरेशी झोप ही अत्यावश्यक असते. अपुर्या झोपेने दैनंदिन काम करणेही कठीण होत असते. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी रोजची गाढ झोप गरजेची आहे. आता एका नव्या संशोधनानुसार जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्ही एक स्वार्थी व्यक्ती बनू शकता.
'पीएलओएस बायोलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. बर्कलीच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी तीन संशोधनांमधून 'सेल्फिश इफेक्ट'चे अध्ययन केले. त्यांना आढळले की झोपेत थोडीशी घट झाल्यानेही लोकांच्या चेतासंस्थेशी संबंधित क्रिया व वर्तन यांच्यावर प्रभाव पडतो. झोपेमध्ये केवळ एक तासाची घट झाल्यानेही दुसर्यांना मदत करण्याच्या वृत्तीमध्ये घट होऊ शकते व आपल्यामधील दया भावनाही कमी होते.
ब्रेन स्कॅनिंगमधून असे दिसून आले की झोपेच्या कमतरतेमुळे इतरांच्या मदतीविषयी विचार करण्याशी संबंधित मेंदूचा जो भाग असतो तो कमी सक्रिय होतो. गाढ झोपेच्या अभावी लोकांच्या भावनिक आणि सामाजिक वर्तनात बदल होतो व ते स्वार्थी बनू लागतात. यापूर्वीच्या संशोधनांमधून असे दिसले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे एंग्झायटी व डिप्रेशनसारखे मानसिक विकार तसेच मधुमेह व लठ्ठपणासारख्या शारीरिक समस्या निर्माण होतात.