विश्वसंचार

एवढ्या जोरात जांभई दिली की, जबडाच अडकला!

Arun Patil

न्यू जर्सी : आपल्यापैकी जवळपास सर्वचजण दिवसातून अनेकदा जांभई देतात. एखाद्याला जांभई देताना पाहिल्यास आपल्यालाही जांभई येते असं म्हटलं जातं. सामान्यपणे कंटाळा, आळस आला की जांभई दिली जाते. अमेरिकेतील एका महिलेने दिलेली एक जांभई सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या महिलेने एवढ्या जोरात जांभई दिली की, तिचा जबडा उघडाच राहिला! या महिलेचा जबडा अडकला आणि तिचे तोंड उघडेच राहिले. जेना सेंटारा असं या या तरुणीचं नाव असून ती 21 वर्षांची आहे.

जेना ही अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहते. तिने व्हिडीओच्या माध्यमातून तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. जेनाच्या 21 व्या वाढदिवसाच्या काही दिवसआधीच तिच्याबरोबर हा विचित्र प्रकार घडला. जांभई देताना जेनाने एवढ्या मोठ्याने तोंड उघडलं की, तिचा जबडाच अडकला. त्यामुळे तिला तोंड बंद करता येईना. आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर जेना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली.

त्यावेळेस तिला डॉक्टरांनी तू एवढा जोर लावून जांभई दिली की, तुझा जबडा हलला आहे, असं सांगितलं. तिच्या जबड्याची तपासणी करण्यात आली. तोंड उघडं राहिलेल्या जेनाचा तशाच अवस्थेत एक्स रे काढण्यात आला. त्यानंतर तिला मसल रिलॅक्सटंटस् देण्यात आले. म्हणजेच स्नायू पुन्हा सामान्य व्हावेत यासाठीचं विशेष औषध दिल्यानंतर जेनाचं तोंड बंद झालं. या सार्‍यावर प्रतिक्रिया देताना जेनाने, माझ्याबरोबर हे असलं काहीतरी घडलंय यावर माझाच विश्वास बसत नाहीये, असं म्हटलं.

त्यानंतर जेनावर डॉक्टरांनी उपचार केला. त्यामध्ये चार डॉक्टरांनी जांभई देताना तिच्या जबड्यात निर्माण झालेला दोष दूर केला. मिशिगनमधील डॉ. अँथनी यांनी जेनाबरोबर जे घडलं त्याला 'ओपन लॉक' असं म्हणतात, असे सांगितले. यामध्ये जांभई देताना स्नायू अडकल्याने तोंड उघडेच राहते.

SCROLL FOR NEXT