विश्वसंचार

एका तार्‍याभोवती फिरणारे दोन ‘सुपरअर्थ’

Arun Patil

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष अंतरावर दोन 'सुपरअर्थ' शोधल्या आहेत. हे दोन्ही ग्रह एका छोट्या व थंड तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यांना 'टीओआय-4306' किंवा 'स्पेक्युलूस-2' असे नाव आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिस्ट लेटिटिया डेलरेज यांच्या नेतृत्वाखाली खगोलशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने हा शोध लावला.

'अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स' मासिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिला ग्रह 'एलपी 890-9 बी' किंवा 'टीओआय-4306 बी'ला सर्वप्रथम 'ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट' (टेस) च्या सहाय्याने 'नासा'ने पाहिले होते. 'टेस'ची निर्मितीच आपल्या सौरमालिकेबाहेरील ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी झालेली आहे. अशा ग्रहांनाच 'एक्झोप्लॅनेटस्' किंवा 'बाह्यग्रह' असे म्हटले जाते. हा नवा ग्रह पृथ्वीपेक्षा सुमारे 30 टक्के अधिक मोठ्या आकाराचा आहे. तो आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा केवळ 2.7 दिवसांमध्येच पूर्ण करतो.

लीज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या ग्रहाच्या पुष्टीसाठी आपल्या जमिनीवरील 'स्पेक्युलूस' दुर्बिणीचा वापर केला. या दुर्बिणीच्या सहाय्याने केवळ या पहिल्या ग्रहाची पुष्टीच झाली असे नाही तर दुसरा अज्ञात ग्रहही शोधण्यास मदत झाली. दुसर्‍या ग्रहाचे नाव 'एलपी 890-9 सी' किंवा 'स्पेक्युलूस-2 सी' असे आहे. तो पृथ्वीपेक्षा सुमारे 40 टक्के अधिक मोठा आहे. तो आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा 8.5 दिवसांमध्ये पूर्ण करतो. हा तारा 'एलपी 890-9' आपल्या सूर्याच्या तुलनेत 6.5 पट छोटा आहे आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सूर्यापेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यामुळे त्याच्या जवळ असलेल्या 'एलपी 890-9सी' ग्रहावर जीवनास पोषक स्थिती असू शकते असे संशोधकांना वाटते.

SCROLL FOR NEXT