विश्वसंचार

‘एआय’ आधारित रक्तचाचणीने आठ वर्षे आधीच ऑस्टिओआर्थरायटिसचे निदान

Arun Patil

वॉशिंग्टन : हाडांचा ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार जडल्याचे 'एक्स-रे'च्या सहाय्याने निदान होण्याच्या आठ वर्षे आधीच या आजाराचे निदान होऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. हे निदान 'एआय' आधारित रक्तचाचणीच्या सहाय्याने शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुडघ्यातील ऑस्टिओआर्थरायटिसची कोणतीही लक्षणे दिसण्यापूर्वीच संबंधित माणसाला भविष्यात हा आजार होऊ शकतो, हे या चाचणीतून समजेल. त्यामध्ये हाडांमधील सुक्ष्म बदलही टिपून घेता येऊ शकतात.

संशोधकांनी यासाठी ऑस्टिओआर्थरायटिसची कोणतीही लक्षणे नसलेल्या 200 महिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण केले. त्यांच्यामध्ये हा आजार उद्भवण्याची काही प्रमाणातील जोखीम दिसून आली. ही जोखीम पारंपरिक धोक्याच्या घटकांवरून ठरवण्यात आली होती. त्यामध्ये पूर्वी गुडघ्याची दुखापत झालेली असणे किंवा गुडघ्याची एखादी शस्त्रक्रिया झालेली असणे यासारख्या घटकांचा समावेश होता.

त्यानंतर संशोधकांनी नव्या 'एआय' चाचणीद्वारे या महिलांच्या रक्तनमुन्यांची पुन्हा चाचणी केली. त्यावेळी रक्तातील संबंधित आजाराची जोखीम वाढवणार्‍या विशिष्ट प्रोटिन्सची तपासणी करण्यात आली. आगामी दहा वर्षांच्या काळात संबंधित व्यक्तीला हा आजार जडू शकतो हे दाखवणारी किमान सहा प्रोटिन्स असतात. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स अ‍ॅडव्हान्सेस' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये या चाचणीच्या सहाय्याने एक्स-रेच्या आठ वर्षे आधीच या आजाराचे निदान होऊ शकते.

SCROLL FOR NEXT