मॉस्को : हिवाळ्यात थंडीने कुडकुडत असताना अनेकांना गरम पाण्याची आंघोळही टाळावीशी वाटते. अशा स्थितीत कुणी बर्फाळ पाण्यात डुबकी घेईल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. मात्र, रशियाच्या एका तरुणीने असा भन्नाट प्रकार केला आहे. उणे 27 अंश सेल्सियस तापमानात अशा बर्फाळ पाण्यातच डुबकी मारून या तरुणीने सर्वांना चकीत केले. डुबकी मारल्यानंतर जेव्हा तिला हुडहुडी भरते तेव्हा एक कप कॉफीचा आस्वाद घेतानाही ही तरुणी व्हिडीओत दिसत आहे. या तरुणीचा रशियाच्या बर्फाळ प्रदेशातील हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकर्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. "थंडीसाठी कॉफी", असे कॅप्शनही या व्हिडीओला दिले आहे. एक तरुणी ब्लॅक स्विमिंग कॉश्चूममध्ये बर्फाळ प्रदेशातील एका तलावात उणे 27 अंश सेल्सिअस तापमानात पाण्यात डुबकी मारते. त्यानंतर तिला हुडहुडी भरल्यावर ती मस्त ऐटीत एक कप कॉफीचा आस्वाद घेताना या व्हिडीओत दिसत आहे. कॉफीचा एक घोट पिऊन झाल्यावर ती मोबाईलमधून उणे 27 अंश सेल्सिअस तापमान असल्याचे लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवते. हा व्हिडीओ रशियाची राजधानी मॉस्को शहराजवळ शूट केल्याची व्हिडीओच्या फुटेजनुसार समजत आहे.
तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण आतापर्यंत या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 9 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकर्याने प्रतिक्रिया देत म्हटले, फिनलँड आणि नॉर्वेसारख्या देशांमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. रशिया परिसरात राहणारे काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. या तरुणीनेही अशाच प्रकारे स्टंटबाजी केली आहे.