न्यूयॉर्क ः सध्या हरेक नमुन्याचे रोबो बनवले जात आहेत. जपान तर रोबोंचे जणू काही 'माहेरघर'च बनला आहे. मानवासारखे बोलणारे, भावभावना दर्शवणारे रोबोही बनत आहेत. आता मानवासारख्या संवेदनांसह स्मार्ट रोबोटस्ची नवीन पिढी विकसित करण्यासाठी वैज्ञानिकांनी नवीन प्रकारची इलेक्ट्रॉनिक त्वचा विकसित केली आहे. ही ई-स्किन वेदना ओळखण्याची क्षमताही शिकू शकते. ही खास त्वचा विकसित करण्याचे काम ग्लासगो विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्यांनी या घटकाला 'कॉम्प्युटेशनल इलेक्ट्रॉनिक स्किन' असे नाव दिले. हा मुळात एक प्रकारचा कृत्रिम धागा आहे ज्यामध्ये नवीन प्रकारची प्रक्रिया स्थापित केली गेली आहे. ही प्रणाली सिनॅप्टिक ट्रान्झिस्टरवर आधारित आहे.
जे तंतोतंत मेंदूच्या न्यूरल मार्गांप्रमाणे काम करते, ज्याद्वारे रोबो वेदना जाणवण्यास शिकू शकतो. या संशोधनात असे दिसून आले आहे की या त्वचेमध्ये बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देण्यास शिकण्याची क्षमतादेखील आहे. आतापर्यंत संशोधक दीर्घकालीन रोबोटस्साठी स्पर्श-संवेदनशील कृत्रिम त्वचा विकसित करण्यावर अनेक वर्षांपासून काम करीत होते. बहुतेक काम पृष्ठभाग संपर्क किंवा दाब संवेदन पद्धतींवर केले गेले आहे. जेव्हा जेव्हा हे सेन्सर्स एखाद्या वस्तूच्या संपर्कात येतात, त्यावेळी संगणकावर डेटा पाठवतात. त्या माहितीवर प्रक्रिया होऊन नंतर प्रतिसाद दिला जातो.
परंतु, या पद्धतीमुळे विलंबिय प्रतिक्रिया येतात ज्यामुळे त्वचेची परिणामकारकता वास्तविक-जगातील क्रियाकलापांमध्ये कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी, ग्लासगोमधील संशोधकांनी मानवाच्या वरवरच्या मज्जासंस्थेच्या त्वचेपासून प्रेरणा घेऊन त्यांचा अर्थ लावला आणि विलंब व ऊर्जेचा वापर यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळवली. प्रा. रविंदर दहिया यांच्या नेतृत्वाखाली बेंडेबल इलेक्ट्रॉनिक्स अँड सेन्सिंग टेक्नॉलॉजी गटाने अशा मॉडेलवर काम केले जे मानवांमधील संवेदी मज्जातंतूंच्या कार्यांप्रमाणेच काम करू शकतील. तज्ज्ञांनी झिंक ऑक्साईड नॅनोवायरपासून बनवलेल्या 168 सिनॅप्टिक ट्रान्झिस्टरचा ग्रीड तयार केला आणि त्यांना थेट प्लास्टिकच्या लवचिक पृष्ठभागावर बसवले. त्यानंतर त्यांनी मानवी आकाराच्या रोबोटिक आर्ममध्ये स्किन-सेन्सिंग सिनॅप्टिक ट्रान्झिस्टरचे रोपण केले जे रोबोटिक हाताला काही स्पर्श करताच आपोआप मागे जाते.