बीजिंग : तंत्रज्ञान विकासासह अनेक क्षेत्रात रोबोंचा वापर वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने एआय संचलित असा रोबो तयार केला आहे, जो गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत करणार आहे. या पोलिस रोबोंना आरटी-जी असे नाव देण्यात आले आहे. हा गोलाकार रोबो स्वयंपूर्ण हालचाली करण्यासाठी तत्पर असतो. लॉगोन टेक्नॉलॉजीने हा तंत्रज्ञानातील नवा आविष्कार प्रत्यक्षात साकारला आहे.
चायनीज प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरटी-जी पाश्चिमात्य देशातील अन्य दक्ष रोबोंच्या तुलनेत बराच वेगळा आहे. हा रोबो वेळप्रसंगी गुन्हेगारांचा पाठलाग करत त्यांना जेरबंद करण्यासाठीही सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा रोबो कशा पद्धतीने गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना जखडून ठेवेल, याचे चित्रण करण्यात आलेला एक व्हिडीओ देखील या कंपनीने जारी केला आहे. या व्हिडीओत सदर रोबो रस्त्यावर गस्त घालत असताना संशय आल्यास त्यांचा पाठलाग करत असतानाही दिसून आला आहे. आपण पोलिसांना चकवून पोबारा करू शकतो, ही चोरांची धारणा नेस्तनाबूत करण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे लोगॉन टेक्नॉलॉजीने याप्रसंगी म्हटले आहे.
आरटी-जी रोबोमध्ये एआयच्या मदतीने अनेक खास फिचर्स समाविष्ट केले गेले आहेत. हा रोबो आवश्यकतप्रमाणे दूरवर जाळी फेकू शकतो आणि अगदी उंचावरील ठिकाणीही सहजपणे वावरू शकतो. या रोबोची ताशी 35 किमी वेगाने जलद चालण्याची क्षमता आहे. यात अत्याधुनिक सेंसर्स आणि चेहर्याची ओळख करू शकणारे सॉफ्टवेअर देखील आहे. याशिवाय, संदिग्ध घडामोडी टिपण्याची त्याची क्षमता आहे. भविष्यात चोर पकडू शकेल, असा हिरो, असे चायनीज माध्यमांनी या रोबोचे वर्णन केले आहे. हा रोबो जमिनीवर आणि पाण्यातही तितक्याच ताकदीने कार्यरत राहू शकतो, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. याशिवाय थोडेथोडके नव्हे तर तब्बल 4 टन वजन वाहून नेण्याची त्याची ताकद असल्याचेही सदर कंपनीने म्हटले आहे. कोणत्याही हल्यात किंवा आक्रमणात नुकसान होणार नाही, अशी या रोबोची संरचना आहे. शिवाय, सोसता येणार नाही, असा धोका असल्यास अन्य रोबोला संदेश देण्याची तरतूदही या सॉफ्टवेअरमध्ये केली गेली आहे.