विश्वसंचार

आता गायी परिधान करतील स्मार्ट वॉच!

Arun Patil

बीजिंग : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अनोखी गॅझेटस् आलेली आहेत. त्यामध्ये स्मार्ट टॅटूपासून ते 'ऐकणार्‍या कपड्यां'पर्यंत अनेक गॅझेटस्चा समावेश होतो. स्मार्टवॉचचा वापर तर हल्ली अनेक लोक करीत असतात. त्यामधून आपल्याला आपण किती पावले चाललो यापासून ते आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात इथंपर्यंत अनेक गोष्टी समजू शकतात. आता असे स्मार्टवॉच चक्क गायींनाही परिधान करता येईल. चीनच्या साऊथवेस्ट जियाओतोंग युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जनावरांचे आरोग्य, प्रजनन आणि लोकेशन ट्रॅक करण्यासाठी हे खास स्मार्टवॉच बनवले आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की हे स्मार्टवॉच गायीच्या गळ्यात किंवा पायावर घालता येईल. त्यांच्या सहाय्याने गायींच्या अगदी छोट्या हालचालीही ट्रॅक करणे सोपे होईल. या स्मार्टवॉचमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला गेला आहे. गायीच्या हालचालींमधून जी ऊर्जा उत्सर्जित होईल ती या बॅटरीत गोळा होऊन डिव्हाईसला चालू ठेवेल. याचा अर्थ पारंपरिक वॉचप्रमाणे त्याला वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नाही.

संशोधक जुताओ झांग यांनी सांगितले की स्मार्टवॉचच्या माध्यमातून गायींचा दैनंदिन व्यायाम, प्रजनन चक्र, त्यांना होणारे आजार, दुधाचे उत्पादन आदी गोष्टींवर लक्ष ठेवण्यास मदत मिळेल. त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले ठेवणे व त्यांचे चांगल्याप्रकारे प्रजनन घडवणे तसेच दुधाचे उत्पादन वाढवणे या गोष्टी शक्य होतील. याशिवाय गायींच्या आजुबाजूच्या वातावरणाच्या स्थितीलाही ट्रॅक केले जाऊ शकते. त्यामध्ये ऑक्सिजनचा स्तर, तापमान, हवेतील आर्द्रता आणि हवामानाची स्थिती यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT