न्यूयॉर्क : बिल क्लिंटन, जेफ बेजोस यांच्यासारख्या अनेक धनाढ्य उद्योजकांनी अलीकडच्या काळात आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. हे अत्यंत महागडे घटस्फोट जगाचे लक्ष वेधून गेले. आता 'गुगल'चे सहसंस्थापक आणि 8.23 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या सर्गेई ब्रिन यांनी आपल्या दुसर्या पत्नीला घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्गेई हे जगातील सातवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
सर्गेई ब्रिन यांनी स्थानिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 48 वर्षी सर्गेई यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये निकोल शानाहानशी गुप्तपणे लग्न केले होते. त्याचवर्षी निकोलला एक मुलगीही झाली. आता दोघे 15 डिसेंबर 2021 पासून वेगळे राहत आहेत. निकोल स्वतः एक वकील आणि आंत्रप्रोन्योर आहे. आमचे मतभेद समझोत्याच्या पलीकडे गेले असल्याचे सर्गेई यांचे म्हणणे आहे.
मात्र, या प्रकरणात कमालीची गोपनीयता राहावी असे त्यांना वाटते. याचे कारण म्हणजे घटस्फोट किंवा संरक्षणाची माहिती जाहीर झाल्यास मुलीचे अपहरण होईल किंवा तिला अन्य काही त्रास होईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे खटला तत्काळ निकाली लागावा म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. त्यांनी 2015 मध्ये पहिली पत्नी एन. वोजकिक यांना घटस्फोट दिला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. सर्गेई यांनी कितीही लपवाछपवी केली तरी त्यांचा दुसरा घटस्फोट हा सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. विशेष म्हणजे पहिल्या सातपैकी सहा अब्जाधीशांचा घटस्फोट झाला आहे!