विश्वसंचार

आग लालसर, कोळसा काळा; त्यातून येणारा धूर पांढरा कसा?

Arun Patil

मेक्सिको : आपल्या आजूबाजूला आपण अनेक गोष्टी रोज पाहत असतो. पण आपल्यापैकी खूप कमी जण त्याचा अतिशय बारकाईने विचार करतात. आता इंधनाचा विचार केला तर कोळसाही नजरेसमोरून तरळून जातो. कोळसा काळा असतो. पण ज्वलनशील झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी आग मात्र लालबुंद, पिवळसर असते आणि त्यातून बाहेर पडणारा धूर वेगवेगळ्या रंगांचा असतो. यामुळे, कोळसा काळा, आग लालसर आणि धूर पांढर्‍या रंगाचा कसा, हा प्रश्न पडणे स्वाभाविक ठरतो. हे कसे होते, याचे कारणही अतिशय रंजक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धूर कोणत्या घटकाच्या जळण्यातून बाहेर पडतो, यावर त्याचा रंग अवलंबून असतो. हिवाळ्यात आपण ऊब मिळण्यासाठी पेटलेल्या कोळशावर हात शेकतो. काही घरांमध्ये कोळशाच्या शेगडीवर अन्न शिजवले जाते. धुराचे विविध प्रकार असतात. धुराच्या रंगामुळे तो कशापासून निघालाय हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ काळा, दाट धूर सूचित करतो, की जवळपास एखादी गोष्ट तीव्र आगीने लपेटलेली आहे. याशिवाय मंद, पांढरा आणि पसरणारा धूर, जो प्रथम दाट आणि लवकरच विरळ होणारा असतो, तो वाफेचे संकेत देतो. तपकिरी धूर लाकूड ओले किंवा अर्धवट जळाल्याचे दर्शवतो.

कोळसा, कचरा, कच्चे लाकूड यासारख्या वस्तू जाळल्याने निर्माण होणारा धूर पर्यावरणासाठी सर्वात धोकादायक असतो. हा धूर हवेत मिसळल्यावर हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करतो आणि त्यामुळे माणसाला, प्राण्यांना, सर्वच घटकांना त्रास होतो.

जेव्हा कोळसा जाळला जातो आणि तो थोडासा ओला असेल, तर त्यातून पांढरा धूर येतो. वास्तविक कोळसा जाळल्यावर सल्फाइड तयार होतो. त्यामुळे कोळसा काळा, आग लाल असूनही पांढरा धूर बाहेर पडतो. हा धूर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असतो. यामुळे वायू प्रदूषणात वाढ होते, हे सातत्याने अधोरेखित होत आले आहे.

SCROLL FOR NEXT