विश्वसंचार

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात बेसुमार वृक्षतोड

Arun Patil

रिओ डी जनैरो : अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित जंगलाला 'जगाचे फुफ्फुस' असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात हे जैवविविधतेने संपन्न असलेले जंगल वेळोवेळी संकटात सापडले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या जंगलात भीषण वणवे लागत आहेत आणि ही जगासाठी चिंतेचीच बाब बनली. आता तर तिथे बेसुमार वृक्षतोडही होत असल्याचे दिसून आले आहे.

विशेषतः ब्राझीलच्या क्षेत्रातील अ‍ॅमेझॉन जंगलात अशी बेसुमार वृक्षतोड होत आहे. नॅशनल स्पेस रिसर्च एजन्सी (इंपे)च्या माहितीनुसार यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच तिथे न्यूयॉर्क शहरापेक्षा पाचपट अधिक मोठ्या क्षेत्रातील झाडे कापली गेली आहेत. गेल्यावर्षी याच काळात झालेल्या वृक्षतोडीपेक्षा हे प्रमाण 10.6 टक्के अधिक आहे.

ब्राझील सरकारच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये जानेवारी ते जूनपर्यंत अ‍ॅमेझॉन जंगलाचा 3,988 चौरस किलोमीटर क्षेत्राचा भाग वृक्षतोडीने उद्ध्वस्त झाला. 2015 पासून आतापर्यंतचा हा वृक्षतोडीचा उच्चांक आहे. 'इंपे'ने वृक्षतोडीबाबतच्या आपल्या 'डेटेर-बी डेटा सीरिज'च्या संकलनास 2015 च्या मध्यापासून सुरुवात केली होती. रिपोर्टनुसार यावर्षीच्या केवळ जून महिन्यातच वृक्षतोड 5.5 टक्क्यांनी वाढली आहे आणि 1120 चौरस किलोमीटरचा परिसर नष्ट झाला आहे.

एकाच महिन्यात जंगलाची इतकी तोड करण्याचाही हा एक भयावह विक्रमच आहे. एका रिपोर्टनुसार अ‍ॅमेझॉनच्या जंगलाच्या तोडीमुळे तेथे वणवे लागण्याचे प्रकारही असामान्य रूपाने वाढले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही स्थिती अधिकच भयावह होऊ शकते. 'इंपे'च्या रिपोर्टनुसार गेल्या पंधरा वर्षांमध्ये जून महिन्यात ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन जंगलात सर्वाधिक वणव्यांची नोंद झाली आहे.

SCROLL FOR NEXT