विश्वसंचार

असेही लोक, जे गावाचे नावच सांगत नाहीत!

Arun Patil

कोलोब्रोरो : इटलीतील डोंगर माथ्यावर कोलोब्रोरो नावाचे गाव वसले आहे. हे गाव इतके शापित आहे की, स्थानिक लोक या गावाचे नावही उच्चारणे पाप समजतात. यामागील कारण असे आहे की, तेथे एकापेक्षा एक अशा भीतीदायक घटना झाल्या आहेत, ज्यामुळे गावाचे नाव घेतले तरी अरिष्ट घडते, अशी या लोकांच्या मनात भीती आहे.

द सनच्या एका रिपोर्टनुसार, कोलोब्रोरो गाव अपघात, नैसर्गिक आपत्तीसारख्या भयंकर घटनांचे केंद्र ठरत आले आहे. 1900 च्या दशकापासूनच त्याची सुरुवात झाली आहे. बियाजियो वर्जिलिओ हा अहंकारी वकील याच गावातील होता. वैशिष्ट्य असे की, तो एकही केस हरत नव्हता. एकदा त्याने मोठा दावा केला. तो म्हणाला, 'जर मी काही सांगत असेन आणि ते खोटे असेल तर हे वरील झुंबर काही खाली कोसळणार आहे का?' आश्चर्य म्हणजे त्याने हे शब्द उच्चारताच झुंबर थेट खाली त्याच्यावरच कोसळले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर सातत्याने कोणत्या ना कोणत्या घटना घडत गेल्या आणि हे गाव शापित आहे, असेच अधोरेखित होत राहिले. काही वेळा या गावात दोन हृदये आणि तीन फुफ्फुसे असलेल्या मुलांचा जन्म झाल्याचे वृत्त पसरले. कार अपघात होऊ लागले, भूस्खलन होऊ लागले. या गावाचे नाव कोलोब्रोरो हे कोलबर या शब्दापासून पडले, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे आणि कोलबर या शब्दाचा अर्थ जेथे वाईट शक्ती राहते, असा होतो. दरवर्षी ऑगस्टमध्ये या गावात स्ट्रीट शो आयोजित केला जातो आणि जे पर्यटक येथे येण्याचे धाडस करतात, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांना विशेष ताबीज दिले जाते. पण, काहीही झाले तरी येथील लोक आपल्या गावाचे नाव मात्र उच्चारतच नाहीत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT