विश्वसंचार

अवकाशात वाढणार अंतराळ स्थानकांची संख्या

Arun Patil

लंडन : रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. या युद्धामुळे दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून बाहेर पडणार असल्याची घोषणा रशियाने यापूर्वीच केली आहे. यामुळे अवकाशात एक नवी स्पर्धा दिसण्याची शक्यता बळावली आहे. या घोषणेनंतर रशिया भविष्यात आपले स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करणार आहे. चीनचे अंतराळ स्थानक सध्या जवळजवळ तयार झाले आहे. यामुळे 'नासा'लाही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाबत ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. यामुळे अवकाशात आता अंतराळ स्थानकांची संख्या निश्‍चितपणे वाढणार असल्याचे समजते.

भविष्यात अवकाशात मोठी स्पर्धा पाहावयास मिळेल, असे संकेत गेल्या काही वर्षांपासून मिळत होते. युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे रशियाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचे वेगळे अंतराळस्थानक तयार करण्याची घोषणा केली.
सुमारे 24 वर्षांपूर्वी अमेरिका व रशियाने अन्य देशांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामास सुरुवात केली, तेव्हा चीन या प्रकल्पात सहभागी नव्हता. तेव्हापासूनच चीनने स्वतःच्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीस सुरुवात केली. आता ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे.

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर अमेरिका व युरोपने अनेक निर्बंध लादण्याबरोबरच अंतराळ क्षेत्रातील सहकार्यही संपुष्टात आले. त्यामुळे रॉसकॉसमोसचे तत्कालीन प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी स्वतंत्र अंतराळ स्थानक स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर नवे प्रमुख युरी बोरिसोव यांनी सांगितले की, 2024 नंतर रशिया आयएसएसचा हिस्सा असणार नाही. आता रशिया स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याच्या तयारीत आहे.

SCROLL FOR NEXT