लंडन ः उत्क्रांतीच्या टप्प्यात कधी तरी सापांनी आपले पाय गमावले होते. आता एका सुपीक डोक्याच्या माणसाने सापाला 'पाय' देण्याचाही प्रयत्न करून पाहिला आहे. त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले. एका अजगराला चार रोबोटिक पायांच्या नळकांडीत ठेवून ही नळी चालवली गेली!
काही वन्यजीवांना हल्ली कृत्रिम पायही लावले जात आहेत. मात्र, एखाद्या सापाला असे पाय लावण्याची कुणी कल्पनाही केली नसेल. एका यू ट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि तो लगेचच व्हायरलही झाला. आतापर्यंत त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची लिंक शेअर केली जात आहे. एका इंजिनिअरने डोके चालवून हा भन्नाट 'जुगाड' केला. एका पोकळ व पारदर्शक नळीत या पिवळसर अजगराला ठेवून नळीला लावलेल्या चार पायांच्या साहाय्याने ती चालवण्यात आली. त्यामुळे अजगरानेही या अनोख्या सवारीचा 'आनंद' लुटला! या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या.