बीजिंग : अंत्ययात्रा निघालेली असताना मृत व्यक्ती अचानकपणे उठून बसते आणि त्यात सामील झालेले लोक आश्चर्यचकित होतात. कधी कधी डॉक्टरांकडून चूक होते आणि ती जिवंत व्यक्तीला मृत घोषित करतात. यात संबंधित व्यक्ती बेशुद्ध असल्यामुळे ती मरण पावल्यासारखे दिसते. अशा स्वरूपाच्या बातम्या अधूनमधून आपल्या वाचनात येतात.
चीनमधील अनहुई प्रांतात घडलेली ही घटना विचित्रच म्हटली पाहिजे. झाले असे की, झांग नावाच्या कोणा एकाला आपण किती लोकप्रिय आहोत हे पाहण्याची उबळ आली. खरे-खोटे पाहण्यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. लोकांना तो खरा वाटला. त्यामुळे अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. 'चायना मॉर्निंग पोस्ट'ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हळूहळू मोठ्या संख्येने झांगच्या अंत्ययात्रेसाठी लोक जमा होऊ लागले.
त्यांची संख्या शंभरवर पोहोचली. चीनमध्ये अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या लोकांना भोजन देण्याची प्रथा आहे. त्यानुसार आलेल्या लोकांचे जेवण झाल्यानंतर प्रत्यक्ष अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यातील काही लोक झांग आता आपल्यात नाही, या कल्पनेने रडत होते. तिकडे झांग मात्र हे द़ृश्य पाहून चांगलाच सुखावला. अंत्ययात्रा पाहून रस्त्याच्या कडेला उभे असलेले लोकसुद्धा हळहळताना दिसत होते. अखेर स्मशानभूमी जवळ येऊ लागली आणि झांग अचानकपणे उठला. एवढेच नव्हे, तर हात जोडून त्याने अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांना नमस्कारही केला. हे पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला.
काही काळापूर्वी ज्याला अंतिम निरोप देण्याची तयारी केली, तीच व्यक्ती समोर दत्त म्हणून उभी आहे यावर त्यांचा विश्वासच बसेना. नंतर झांगने मंद स्मित करून सगळा खुलासा केला. मात्र स्थानिक अधिकार्यांना त्याने जनतेच्या भावनांशी केलेली गंमत अजिबात आवडलेली नाही. मरणाशी संबंधित रितीरिवाजांचा झांगने भंग केल्याचे अधिकार्यांनी म्हटले असून, सध्या या घटनेची शासकीय चौकशी सुरू झाली आहे. यापूर्वी ब्राझीलमधील एका व्यक्तीनेही स्वतःला मृत घोषिक करून आपल्या लोकप्रियतेची चाचपणी केली होती.