विश्वसंचार

अंटार्क्टिकाच्या तळाशी सापडली आइसफिशची सहा कोटी घरटी

निलेश पोतदार

बर्लिन : अंटार्क्टिकामध्ये 'बर्फाळ मासा' म्हणजे 'आइसफिश'ची तब्बल सहा कोटी घरटी सापडली आहेत. ही घरटी अंटार्क्टिकातील 'वेड्डेल' नामक समुद्राच्या तळाशी सापडली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मासे आणि घरटी पाहून शास्त्रज्ञही चकित झाले. कारण, यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने 'आइसफिश'ची घरटी कधीच सापडली नव्हती. सध्या हे माशांचे जगातील मोठे प्रजनन केंद्र असल्याचे मानले जात आहे.

अल्फ्रेड वेगनर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ ऑटन पर्सर हे 'आर. व्ही, पोलारस्टेर्न' या जर्मन आइस ब्रोकर जहाजावर अंटार्क्टिकामधील व्हेल माशांवर संशोधन करत होते. याचवेळी पदवीधर विद्यार्थी लिलियन बोरिंगरला कॅमेर्‍यातून चकित करणारे दृश्य दिसले. लिलियनने लागलीच ऑटन यांना बोलावले. ज्यावेळी ऑटन यांनी कॅमेर्‍याची स्क्रिन पाहिली, त्यावेळी तेसुद्धा आश्चर्यचकित झाले. कारण, जहाजाच्या खाली कोट्यवधींच्या संख्येने आइसफिशची घरटी होती. हा कॅमेरा जहाजाच्या खालील भागावर लावण्यात आला होता.

ऑटन व लिलियन यांनी पाहिले की, प्रत्येक 19 इंचावर आइसफिशनी आपले घरटे तयार केले होते. असे हे दृश्य तब्बल 240 कि.मी. परिसरात पसरले होते. प्रत्येक ठिकाणी आइसफिशच नजरेसमोर दिसत होते.

या माशांना वैज्ञानिक भाषेत 'नोटोथेनिऑईड' आइसफिश असे म्हटले जाते. हे मासे अत्यंत कमी तापमान असणार्‍या दक्षिणेकडील समुद्री भागात आढळून येतात. हा असा एकटा कशेरूकिय म्हणजे वर्टिब्रेट जीव आहे की, त्याच्या रक्तात हिमोग्लोबिन आढळत नाही. हिमोग्लोबिन नसल्याने या माशाचे रक्त पांढरे असते. यामुळे या माशांना व्हाईट ब्लडेड असेही म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT