विश्वसंचार

झिगझॅग ड्रायव्हिंग अन् बारा हजारांचा भुर्दंड!

Arun Patil

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची संख्या काही कमी नाही; पण यासाठी काही महाभाग काय अचाट प्रयोग करतील, याचा काही नेम नसतो. काही जण यासाठी अगदी आपला जीव धोक्यात घालण्यासाठीही मागे-पुढे पाहत नाहीत. अशीच एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टार बनण्यासाठी झिगझॅक ड्रायव्हिंग करताना पोलिसांना आढळून आली आणि स्टार बनण्याऐवजी उलट 12 हजार रुपयांचा दंड भरावा लागली असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

या व्हिडीओत एक व्यक्ती झिगझॅग गाडी चालवत वाहतुकीला अडथळा करत असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर खरे नाट्य सुरू झाले. या व्यक्तीला केवळ रील तयार करायचे होते आणि त्यातून त्या व्यक्तीने झिगझॅग गाडी चालवणे सुरू केले; पण तोवर एकाने याचा व्हिडीओ केला होता. तो पाहता पाहता व्हायरल झाला आणि पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेतले.

कधी या दिशेला तर कधी त्या दिशेला, असे झिगझॅग ड्रायव्हिंग वर्दळीच्या रस्त्यावर केले गेल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आणि सदर व्यक्तीला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या गाडीचालकावर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

सोशल मीडिया रिल्स बनवताना या चालकाने मोटर व्हेईकल अ‍ॅक्टच्या नियमांचा भंग केला. त्यामुळे त्याचे एकूण 12000 रुपयांचे चलन कापले असल्याचे पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. असे व्हिडीओ पोस्ट करणार्‍या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

SCROLL FOR NEXT