लंडन : चेक प्रजासत्ताकातील दोन गिर्यारोहकांना Krkonoš e पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या झेविचिना टेकडीवरील जंगलात चकित करणारा ऐवज सापडला आहे. या खजिन्याची एकूण किंमत 340,000 डॉलर्सहून (सुमारे 2.8 कोटी रुपये) अधिक आहे आणि तो कदाचित दुसर्या महायुद्धादरम्यान छळातून पळून जाणार्या लोकांनी लपवलेला असावा, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हा खजिना सुमारे 15 पाऊंड (6.8 किलो) वजनाचा असून, दोन कंटेनरमध्ये एका दगडी ढिगार्याखाली सापडला. पहिल्या बॉक्समध्ये 598 नाण्यांचा समावेश असून, त्यात 1808 ते 1915 या कालखंडातील फ्रान्स, बेल्जियम, ऑट्टोमन साम्राज्य, रशिया आणि ऑस्ट्रो-हंगेरी येथील नाणी आहेत. काही नाणी तर 1921 मध्ये पूर्व युगोस्लाव्हियातील सर्बिया व बॉस्निया-हर्जेगोव्हिना प्रांतात पुन्हा चलनात आणलेली होती. यावरून या नाण्यांचा वापर किंवा हस्तांतरण नंतरच्या काळातही झाले असावे. पूर्व बोहेमियाच्या संग्रहालयाचे नाणे तज्ज्ञ वोजटेख ब्राडले यांच्या मते, ‘या खजिन्यातील काही नाण्यांवरील contramarks म्हणजेच नंतर घातलेले सूक्ष्म ठसे हे पहिल्या महायुद्धानंतरचे आहेत. म्हणून नाण्यांवरील तारीख निर्णायक नाही.’
या पहिल्या बॉक्सपासून सुमारे एक मीटर अंतरावर आणखी एक धातूचा बॉक्स सापडला, ज्यामध्ये 10 बांगड्या, 16 सिगारेट केस, एक मऊ वायर मेशची पिशवी, साखळी, कंगवा आणि कॉम्पॅक्ट पावडर केस यांचा समावेश आहे. हे सर्व दागिने पिवळ्या धातूपासून, म्हणजे शक्यतो सोन्याच्या मिश्रधातूपासून तयार करण्यात आलेले आहेत. या ऐवजाची निश्चित तारीख किंवा मूळ अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी 1921 च्या contramark आणि चेक-जर्मन वसाहतीजवळील स्थान लक्षात घेता, हे दागिने आणि नाणी 1938 मध्ये नाझी छळातून पळून जाणार्या लोकांनी सुरक्षित ठेवलेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याकाळी या भागात 1,18,000 ज्यू वस्ती होती; परंतु दुसरे महायुद्ध संपेपर्यंत त्यापैकी केवळ 14,000 लोक उरले होते. बाकीचे लोक थेरेसिएन्स्टाट गेटो किंवा ऑशविट्झ येथे नेण्यात आले होते किंवा स्थलांतरित झाले होते.