मुंबई : इंटरनेटच्या दुनियेत दररोज काही ना काही असे व्हायरल होत असते, जे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कधी कोणी अंगावर काटा आणणारे स्टंट करतो, तर कधी कोणी असे अजब प्रकार करतो की ‘हे जग नेमके कुठे चालले आहे?’ असा प्रश्न पडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून नेटिझन्स पुरते चक्रावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क जनावरांचा चारा म्हणजेच ‘भुसा’ खाताना दिसत आहे!
व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती अगदी आरामात हातातील बुट्टीतील मुठभर भुसा घेतो आणि थेट तोंडात टाकतो. तो हा भुसा इतक्या सहजतेने चघळत राहतो, जणू काही तो एखादा चवदार स्नॅक खात आहे. हा सगळा प्रकार घडत असताना तिथे मंडपात उपस्थित असलेले लोक पुरते थक्क झाले. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आजूबाजूचे लोक या व्यक्तीकडे अत्यंत आश्चर्याने आणि गोंधळलेल्या अवस्थेत पाहत आहेत. काही लोक तर भीतीने थोडे मागे सरकले, तर काहींनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, भुसा खाणाऱ्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जराही भीती किंवा संकोच नव्हता. तो अगदी सामान्यपणे सतत भुसा चघळत होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड होताच वाऱ्यासारखा पसरला असून, युजर्स यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर केवळ काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा अत्यंत खालच्या पातळीचा स्टंट केला गेला आहे. काही लोकांनी चिंता व्यक्त करत ‘या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. मात्र ही व्यक्ती भुसा खात नसून एखाद्या कार्यक्रमात गावातील प्रथेप्रमाणे काही तरी विशिष्ट पदार्थ खात असावी, असेही काहींना वाटते.