File Photo
विश्वसंचार

रात्रभर चिंता जाणवत असल्यास दोन तास आधी योगा करणे फायदेशीर!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : रात्रीच्या वेळी चिंता अधिक जाणवू लागतात, याचा अनुभव अनेकांना येत असेल. मानसिक स्वास्थविषयक समस्या याच कालावधीत अधिक जाणवत असतील, तर त्यातही यामुळे आश्चर्याचे कारण नाही. पण, आपण झोपी जाण्याच्या तयारीत असतो, त्यावेळी मेंदू सर्वाधिक सक्रिय होतो, हे त्याचे मुख्य कारण आहे आणि रात्री चिंता अधिक वाटत असेल, तर झोपी जाण्यापूर्वी काही काळ योगा करावा, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. पेसिल्वेनिया विद्यापीठातील एंग्झायटी तज्ज्ञ लिली ब्राऊन व त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबत संशोधन केले.

व्यस्त दिनक्रमानंतर आपण झोपी जाण्याच्या तयारीत असतो, त्यावेळी मेंदू अधिक सक्रिय होतो. दिवसभर आपण आपले कुटुंबीय, मित्र यांच्यासह संवाद साधत असतो. पण, रात्री जवळपास प्रत्येक जण झोपी जाण्याच्या वेळेस असे होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर रात्री मनातील विचारांची संख्या वाढू शकते, यामुळे यावर मार्ग काढणे अधिक महत्त्वाचे ठरते, असे या अभ्यास गटाचे म्हणणे आहे.

डॉ. लिली यांनी अशा समस्यांवर मात करण्यासाठी झोपी जाण्यापूर्वी दोन तास आधी हलक्या प्रमाणात योगासने करावीत, असे म्हटले आहे. त्यानंतर दोन तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनचा वापर करू नये, असे त्या म्हणतात. वॉशिंग्टन विद्यापीठातील याच विषयावरील आणखी एक तज्ज्ञ रेबेका कॉक्स यांनी झोपी जाण्यापूर्वी आपल्या मनात ज्या चिंता आहेत, त्या एका कागदावर लिहून काढाव्यात, असे यात सूचवले आहे. यासाठी दहा मिनिटांचा वेळ द्यावा, असे त्या सांगतात.

सिनसिनाटी वैद्यकीय विद्यापीठातील एंग्झायटी डिसऑर्डर प्रोग्रॅमचे संचालक डॉ. जेफरी स्ट्रॉन म्हणतात, ‘झोपी जाण्यापूर्वी हलका नाश्ता करणे शक्य झाल्यास यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. मात्र, अशावेळी कॉफी टाळावी. कारण, त्यात असलेल्या कॅफेनमुळे मनातील चिंतेचे काहूर आणखी उग्र स्वरुप धारण करू शकते आणि अशा परिस्थितीत शांत झोप घेणे दुरापास्त ठरू शकते. काही वेळ ध्यान केल्यास ते ही उपयुक्त ठरू शकते. झोपेवेळी फार प्रखर प्रकाश असणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. आपले जे काही छंद असतील, त्यासाठीही दिवसभरातून थोडा वेळ काढल्यास त्याचाही चांगला परिणाम दिसून येईल’.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT